टीएमटीच्या १४० अतिरिक्त बसफेऱ्या वाढणार

ठाणे : लोकमान्यनगर, उपवन पवारनगर, ओवळा, बोरीवडे गांव आणि धर्माचा पाडा ब्रम्हांड सोसायटी या क्षेत्रात सध्या या मार्गावर चालणा-या 28 बसेसमध्ये 15 बसेसची वाढ करण्यात येणार आहे. या मार्गावर सुरु असलेल्या 325 फे-यांमध्ये 140 अतिरिक्त बस फे-यांची वाढ होऊन एकूण 465 फे-यांव्दारे प्रवाशांना सेवा देण्यांत येणार आहे.

प्रवाशांना वाढीव बसेसव्दारा अतिरिक्त फे-या देण्याकरिता प्रभागातील नगरसेवक, ठाणे प्रवासी महासंघाचे अध्यक्ष मिलिंद बल्लाळ घोडबंदर प्रवासी संघ यांनीही वेळोवेळी मागणी केली होती. नव्याने खरेदी करण्यांत येणाऱ्या सीएनजी बसेस ताफ्यात दाखल होताच ठाण्यातून मुंबई, नवी मुंबई, बोरिवली, भिवंडी, दिवा, डोंबिवली या मार्गावर देखील प्रवाशांच्या मागणीनुसार ठाणे परिवहन सेवेची बस सेवा सुरु करण्यांत येणार आहे. येत्या काही महिन्यात पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनानुसार बॅटरी ऑपरेटेड 81 इलेक्ट्रीक बसेस ठाणे परिवहन सेवेच्या बस ताफ्यात दाखल होतील. यामुळे संपूर्ण एमएमआर रिजनमध्ये सक्षम सेवा देता येईल, असे सभापती विलास जोशी यांनी सांगितले.

आनंदनगर आगारातील खालील मार्गावर देण्यात आलेल्या जादा बसेस

मार्गाचे नांव – ठाणे स्टेशन पश्चिम ते लोकमान्यनगर, ठाणे स्टेशन पश्चिम ते उपवन (गावंडबाग), ठाणे स्टेशन पश्चिम ते पवारनगर, ठाणे स्टेशन पश्चिम ते ओवळा, ठाणे स्टेशन पश्चिम ते बोरीवड गांव, ठाणे स्टेशन पश्चिम ते धर्माचापाडा (ब्रम्हांड)

मार्ग क्र. ३, १०, १२, ५३, ६१, ६२

बससंख्या – २, २, २, ५, २, २ = १५

बसफेऱ्या- २०, २०, २४, ४०, १६, २० = १४०