बेवारस वाहनांसाठी महापालिकांना मिळेना डंपिंग; ठाणे वाहतूक पोलिसांची मोठी अडचण

ठाणे : दिवसेंदिवस ठाणे, भिवंडी, उल्हासनगर, कल्याण-डोंबिवली महापालिका क्षेत्रात हायएंड आणि पारंपारिक चार चाकी वाहनांची ‘गर्दी’ वाढत असताना, या शहरांतील बेवारस वाहनांचीही संख्या वाढत आहे. रस्ता अडवून ठेवणारी ही वाहने ठेवायची कुठे असा मोठा प्रश्न ठाणे वाहतूक पोलिसांसमोर उभा ठाकला आहे.

रस्त्याच्या बाजूला असलेल्या गाड्या बेवारस असल्यातरी त्या सुरक्षित ठिकाणी ठेवण्यासाठी ‘डंपिंग ’ देण्याची मागणी या  महापालिकांच्या संबंधित वरिष्ठ अधिका-यांकडे केली असता त्यांनी नकारार्थी भोंगा वाजवला. गेल्या दोन वर्षांपासून वरिष्ठ वाहतूक पोलीस अधिकारी याचा पाठपुरावा करत असून, त्यांना सुरक्षित जागा मिळालेली नाही.
बेवारस वाहने वाहतूक पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर संबंधित वाहनांतील स्पेअर्स पार्टस्ची जबाबदारी पोलिसांची असते. कारण हे पार्टस् हरवले किंवा चोरल्यास मालक वाहतूक पोलिसांवर दावा करतात. त्यासाठी ठाणे वाहतूक पोलिस शाखेला सुरक्षित डंपिंग ग्राऊंड असणे महत्वाचे आहे. ठाणे आणि नाशिक रोडवरील डंपिंग यार्ड सुरक्षित नसल्याचे ठाणे वाहतूक शाखेचे पोलिस उपायुक्त बाळासाहेब पाटील यांनी ‘ठाणेवैभव’ ला सांगितले.

ठाणे ते बदलापूर, कल्याण- डोंबिवली, उल्हासनगर ही शहरे ठाणे पोलिस आयुक्तालयाच्या क्षेत्रात आहेत. गेल्या काही वर्षांपासून या शहरांची ‘वाढ’, त्यांच्या हद्दी वाढतच गेल्या. त्यामुळे त्यांच्या क्षेत्रात विविध विकासकांचे प्रकल्प फोफावले परंतु त्या शहरांतील रस्त्यांची ‘रुंदी’ मात्र ‘अरुंद’च राहिली आहे. परिणामी ठाणे शहरासह या अन्य शहरांत रस्ते न वाढल्याने स्थानिक रहिवाशांनी आपल्या चारचाकी, दुचाकी रस्त्यांवर ‘पार्क’ करण्यास प्रारंभ केला.

बेवारस वाहन धारकांचा पत्ता मिळाल्यानंतर ठाणे वाहतूक पोलिस टप्प्याटप्प्याने संबंधितांना नोटीस देतात. ज्या मालकांची ही वाहने आहेत, त्यांनी ४८ तासांच्या आत ही वाहने रस्त्यावरुन हटविण्याचे आदेश नोटीसीद्वारे देण्यात येतात. गेल्या १९ एप्रिल ते ९ मे या कालावधीत ८१४ नोटीस सर्वाधिक ठाणेकर, कल्याण- डोंबिवलीकरांना बजावण्यात आल्या होत्या.