निवडणूक आयोग-ठामपातील मतभेदांमुळे प्रभाग रचना गोत्यात? प्रभाग रचनेच्या अहवालावर आयुक्तांची सहीच नाही

मुंबई: निवडणूक आयोगाने तयार केलेली प्रभाग रचना निवडणूक आयोग आणि ठाणे महापालिका यांच्यातील मतभेदांमुळे गोत्यात येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. अंतिम अहवालावर ठामपाच्या संबंधित अधिकाऱ्याची सही नसल्याने निवडणूक आयोग कोणती भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

राज्य निवडणूक आयोगाने ठाणे महापालिकेने केलेल्या प्रारूप रचनेवर आलेल्या हरकती आणि सूचनांचा विचार करून अंतिम अहवाल पाठवला होता. परंतु त्यावर आयुक्त डॉ. विपीन शर्मा यांची सही नसल्यामुळे ही प्रभाग रचना वादाच्या भोवऱ्यात अडकण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत.

अंतिम प्रभाग रचनेवर केवळ मुख्य निवडणूक आयुक्तांची सही झाली असून त्यांच्याच सहीने प्रभाग रचना प्रसिद्ध करण्यात आली असल्याने ठाणे महापालिकेच्या कारभारावर प्रश्नचिन्ह निर्माण झाल्याचे बोलले जात आहे. यापूर्वीच आपापल्या पक्षाला अनुकूल असे प्रभाग तयार करण्यासाठी सत्ताधारी आणि विरोधकांनी फिल्डिंग लावली होती. ज्यावेळी प्रारूप आराखडा तयार करण्यात आला त्यावेळी देखील या प्रभाग रचनेवर १९६२ ठाणेकरांनी आक्षेप घेतले होते. त्यानंतर महापालिकेच्या डॉ. काशिनाथ घाणेकर नाट्यगृहात या प्रारूप आराखड्यावर घेण्यात आलेल्या सूचना आणि हरकतींवर सुनावणी घेण्यात आली. यावेळी देखील मोठ्या प्रमाणात हरकती आणि सूचनांची नोंद करण्यात आली. या नोंदी करून त्याचा अहवाल निवडणूक विभागाकडे पाठवण्यात आला.

पालिका प्रशासनाने पाठवलेल्या अहवालानंतर निवडणूक विभागानेही अहवालाची दखल घेऊन अपेक्षित बदल करून अंतिम प्रभाग रचना ठाणे महापालिकेकडे प्रसिद्ध करण्यासाठी पाठवली. त्यानंतर ठाणे महापालिकेकडून अंतिम प्रभाग रचना प्रसिद्ध करण्यात आली आहे. ही अंतिम प्रभाग रचना मुख्य निवडणूक आयुक्त यु.पी. एस. मदान यांच्या एकट्याच्या सहीने प्रसिद्ध करण्यात आली आहे. नियमाप्रमाणे मुख्य निवडणूक आयुक्त तसेच महापालिका आयुक्त या दोघांच्या सह्या असणे आवश्यक असते.