शिवसेनेच्या ‘कळवा मिशन’ला अंतिम प्रभाग रचनेचा सुरुंग? प्राबल्य असलेल्या प्रभागांची मोडतोड

ठाणे: आगामी ठाणे महापालिका निवडणुकीसाठी तयार करण्यात आलेल्या अंतिम प्रभाग रचनेत शिवसेनेचे प्राबल्य असलेल्या प्रभागांची मोडतोड करण्यात आल्याने त्याचा फायदा राष्ट्रवादीला होणार आहे. परिणामी शिवसेनेच्या मिशन कळवा मोहिमेला सुरुंग लागण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

ठाणे महापालिकेची अंतिम प्रभाग रचना नुकतीच जाहीर करण्यात आली असून यामध्ये खाडीच्या अलीकडे आणि खाडीच्या पलिकडील वातावरण चांगलेच तापले आहे. प्रभाग रचनेत शिवसेनेला अपेक्षित बदल व्हावा यासाठी शिवसेना पक्षाने संपूर्ण फौज या कामाला लावली होती. मात्र याचा फारसा फायदा शिवसेना पक्षाला झाला नसून प्रभाग रचनेत शिवसनेला असेलेले अपेक्षित बदल करण्यात आलेले नसल्याने सध्या शिवसेना पक्षात चिंतेचे वातावरण आहे.

सध्याचा प्रभाग क्रमांक ३४ मध्ये मनीषा नगर, महात्मा फुले नगर हे परिसर खारीगांवमध्ये होते. यामध्ये आता मनीषा नगर, जानकी नगर आणि खाडीच्या भागातील परिसर देखील जोडण्यात आले असल्याने या ठिकाणी राष्ट्रवादीची ताकद असल्याने शिवसेनेची एक जागा कमी होण्याची चिन्हे आहेत. पारसिक नगर खारीगाव प्रभाग क्रमांक ३५येथील उमेश पाटील आणि पॅनलमध्ये जे नगरसेवक निवडणूक लढवतील असे शिवसेनेचे तीन नगरसेवक निवडून येण्याची चिन्हे आहेत.

दुसरीकडे प्रभाग क्रमांक ३२ मध्ये सध्या शिवसेनेचे दोन तर राष्ट्रवादीचे दोन नगरसेवक आहेत. या प्रभागात वरच्या भागाला विटावा जोडला गेला असून खालच्या बाजूला शिवाजी नगरचा भाग जोडला गेला आहे. त्यामुळे या ठिकाणी देखील शिवसेनेची ताकद कमी करण्याचा प्रयत्न करण्यात आला असून राष्ट्रवादीची ताकद वाढण्याची चिन्हे आहेत.

प्रभाग क्रमांक ३१ मध्ये राष्ट्रवादीचे चार नगरसेवक आहेत. या ठिकाणी राष्ट्रवादीचे तीन नगरसेवक पुन्हा निवडणूक येण्याची चिन्हे असली तरी, राष्ट्रवादीच्या माध्यमातून या ठिकाणी देखील ताकद वाढवण्याचे प्रयत्न सुरु आहेत. प्रभाग क्रमांक ३३ हा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला असून या ठिकाणी राष्ट्रवादीच्या माजी विरोधी पक्षनेत्या प्रमिला केणी, अपर्णा साळवी, कै. मुकुंद केणी आणि मिलिंद पाटील हे प्रतिनिधित्व करत आहेत. या ठिकाणी राष्ट्रवादीची ताकद कायम राहणार आहे.

कळव्यात सध्या शिवसेनेचे आठ तर राष्ट्रवादीचे नऊ नगरसेवक आहेत. अंतिम प्रभाग रचनेत नगर सेवकांची एकूण संख्या १८ झाली आहे. अंतिम प्रभाग रचनमुळे शिवसेनेची सदस्य संख्या कमी होण्याची चिन्हे आहेत. तर राष्ट्रवादीचे नगरसेवक वाढण्याची शक्यता आहे. आता शिवसेनेला खऱ्या अर्थाने मिशन कळवा यशस्वी करायचे असेल तर या गोष्टींकडे गांभीर्याने लक्ष देण्याची आवश्यकता आहे. अन्यथा शिवसेनेच्या मिशन कळव्याला सुरुंग लागण्याचीच अधिक शक्यता असल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे.

नवीन प्रभाग काबीज करण्याची ताकद असलेले उमेदवार शिवसेनेने दिले तर त्यांची मिशन कळवा ही मोहीम यशस्वी होऊ शकते अन्यथा ही मोहीम फसेल असे सेनेच्या एका नगरसेवकाने ‘ठाणेवैभव’ला सांगितले.
कळवा-मुंब्रा मतदार संघात गृहनिर्माण मंत्री डॉ. जितेंद्र आव्हाड यांनी अनेक चांगली नागरी सुविधांची कामे केली आहेत, त्यामुळे पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेस कळवा प्रभाग समिती ताब्यात घेईल असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेसचे मिलिंद पाटील यांनी व्यक्त केला आहे.