भंगार बसमधून मिळाले सहा कोटी; परिवहन घेणार २५ सीएनजी बस

ठाणे: भंगारमधील बस विकून ठाणे परिवहन सेवा मालामाल झाली आहे. १५३ बसच्या विक्रीतून सुमारे सहा कोटींची कमाई झाली असून त्यातून परिवहनच्या ताफ्यात २५ नव्या कोऱ्या येणार आहेत.

ठाणे परिवहन सेवेतील कळवा आणि वागळे आगार येथील १५३ बस निकामी झाल्या होत्या. त्यांची अनेकदा दुरुस्ती करण्यात आली होती, परंतु त्या उपयोगात येत नव्हत्या. सुमारे आठ ते दहा वर्षांपासून या बस भंगारमध्ये पडल्या होत्या. परिवहन प्रशासनाकडून केंद्र सरकारच्या माध्यमातून भंगार बस विक्री करण्याची प्रक्रिया राबविण्यात आली होती. परिवहन प्रशासनाने एका बस करीता एक लाख ८३ हजार रुपये एवढी किंमत लावली होती, परंतु युनिव्हर्सल स्क्रॅप कंपनीने एका बसकरिता तीन लाख ८० हजार रुपये एवढी बोली लावून या कंपनीने तब्बल पाच कोटी ८१ लाखात १५३ बस खरेदी केल्या. या व्यवहारातून परिवहन सेवेला प्रत्येक बसमागे सुमारे दोन लाख रुपये जास्त मिळाले आहेत.

दरम्यान परिवहन सदस्य प्रकाश पाटील यांनी या व्यवहाराबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. ठेकेदाराने मुदत संपली तरी पैसे भरले नाहीत तरी त्यांना 30 दिवसांची मुदत का दिली, असा प्रश्न उपस्थित केला आहे.

या भंगार बसमधून मिळालेल्या पैशांतून परिवहन सेवा २५ सीएनजी बस खरेदी करणार आहे. मागील वेळी ५०० टन भंगार विकून परिवहन सेवेला सव्वा कोटीचे उत्पन्न मिळाले होते आणि आत्ता बसच्या माध्यमातून पाच कोटी ८१ लाख मिळाल्याचे परिवहन महाव्यवस्थापक श्री. बेहरे यांनी सांगितले. श्री. पाटील यांचे आरोप महाव्यवस्थापक श्री. बेहरे यांनी फेटाळून लावले असून अर्धवट माहितीवर हे आरोप केल्याचे त्यांनी सांगितले.