माजी नगरसेवक सुधाकर चव्हाण अनंतात विलीन; भाईंच्या अंत्ययात्रेला चाहत्यांची अलोट गर्दी

ठाणे: ठाणे महापालिकेचे माजी जेष्ठ नगरसेवक सुधाकर चव्हाण (सुधाभाई) यांचे वयाच्या ६५ व्या वर्षी प्रदीर्घ आजाराने निधन झाले. रविवारी त्यांच्यावर अत्यंत शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. शिवाईनगर येथील मंत्रांजली या त्याच्या निवासस्थानाहुन अंत्ययात्रेला सुरुवात झाली. यावेळी ठाण्यातील दिग्गज नेते मंडळी, शिवाई नगर येथील नागरिक, मित्र मंडळीसह मराठी सिनेसृष्टीत कलाकार मोठ्या संख्येने उपस्थित होते. वागळे इस्टेट येथील स्मशानभूमीत त्यांच्यावर धार्मिक पध्द्तीने अंत्यसंस्कार करण्यात आले असून अनेकांना अश्रू अनावर झाले होते.

सुधाकर चव्हाण यांनी गेली 35 वर्ष ठाण्याच्या राजकारणात आपला ठसा कायम ठेवला होता. मागील एक महिन्यापासून त्यांच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरु होते. अखेर शनिवारी दुपारच्या सुमारास प्रदीर्घ आजाराने त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांनी महापालिकेत आपले एक वेगळे स्थान निर्माण केले होते. अपक्ष म्हणून निवडून येणे ही त्यांची खासीयत होती. १९९२ ते २०१७ असे तब्बल २५ वर्षे म्हणजेच पाच टर्म ते महापालिकेत नगरसेवक म्हणून निवडून गेले होते. त्यामुळे त्यांचे सर्वच राजकीय पक्षांमध्ये मित्रसंबध होते.

ठाणे जिल्हा पालकमंत्री एकनाथ शिंदे, गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड, आमदार निरंजन डावखरे, माजी महापौर नरेश म्हस्के, हनमंत जगदाले, अशोक राउल, मनोज शिंदे, आदि नेते उपस्थित होते.

कलाकारांचा आधार गेला

सुधाभाईच्या अंत्ययात्रेला मराठी कलाकारांची उपस्थिती होती. मराठी सिनेसृष्टीतील कलाकारांवर सुधाकर चव्हाण यांचे विशेष प्रेम होते. विविध सांस्कृतिक कार्यक्रमाना मराठी कलाकारांची उपस्थिती पाहायला मिळायची.

त्यांच्या न्याय हक्कासाठी नेहमीच भाईंनी एक पाऊल पुढे टाकत मराठी कलाकारांना मदतीचा हात दिला आहे. अंत्ययात्रेच्या दरम्यान मराठी कलाकारांना देखील अश्रू अनावर झाले. आम्हा मराठी कलाकारांचा आधार गेला अशी भावना यावेळी कलाकारांनी व्यक्त केली. यावेळी दिग्दर्शक महेश मांजरेकर, भाऊ कदम, सुप्रिया पाठारे, अंशुमन विचारे ई. उपस्थित होते.