ठाणे: ठाणेवैभव वासंतिक क्रिकेट करंडक स्पर्धेच्या ब गटात झालेल्या सामन्यात रूट मोबाईल संघाने अरुप्रीत टायगर्स संघाचा पराभव करत अंतिम फेरीत प्रवेश मिळवला. रूट मोबाईलच्या पियुष सोहने यांनी दमदार फलंदाजी करत रूट मोबाईल संघाला विजयाकडे नेले.
रूट मोबाईल संघाने नाणेफेक जिंकून अरुप्रीत टायगर्स संघाला फलंदाजीसाठी पाचारण केले. अरुप्रीतचा संपूर्ण संघ १९.५ षटकांत तंबूत परतला. आकाश जंगीड याने सहा चौकार आणि एक षटकार ठोकत ४७ धावा केल्या तर श्रेयस वैद्य याने २५ धावांचे योगदान दिले. रूट मोबाईलच्या विशाल धागावकर आणि संकेत पांडे यांनी प्रत्येकी तीन बळी घेतले तर शशिकांत कदम आणि दिनार गावकर यांनी प्रत्येकी दोन बळी घेतले. अरुप्रीत संघाने १३८ धावांचे आव्हान रूट मोबाईल संघापुढे उभे केले.
रूट मोबाईल संघाने हे आव्हान अवघ्या १५.१ षटकांत चार गडी गमावून पार केले. पियुष सोहने याने तीन षटकार आणि सात चौकरांच्या मदतीने ५५ चेंडूंत ६८ धावा केल्या. अरुप्रीत टायगर्सकडून सीमांत दुबे आणि श्रेयस वैद्य यांनी प्रत्येकी दोन बळी घेतले.