ठाणे: सामाजिक कार्य करणाऱ्या डॅशिंग समाजसेविका ऋता आव्हाड यांची आज ठाणे विभागीय राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली. या निवडीमुळे ठाण्यातील महिलांना बळ मिळणार आहे.
राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष विद्या चव्हाण यांनी आज राज्यातील नऊ जिल्ह्यातील महिला अध्यक्षांची नियुक्ती जाहीर केली. ठाणे विभागीय महिला अध्यक्ष हे पद राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नव्हते, परंतु महिलांचे संघटन मजबूत करण्यासाठी ऋता आव्हाड यांच्याकरिता हे पद निर्माण करण्यात आले आहे.
राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या सर्व पदाधिकाऱ्यांची पदे कायम ठेवून हे पद देण्यात आले आहे. मागील काही महिन्यांपासून सौ. आव्हाड यांनी या विविध प्रश्नांवरील राष्ट्रवादीच्या आंदोलनात सक्रिय सहभाग घेतला होता. गृहनिर्माण मंत्री डॉ. जितेंद्र आव्हाड यांच्या कळवा-मुंब्रा मतदार संघात त्यांचे सामाजिक कार्य करत होत्या. आता त्या राजकीय पक्षाच्या अध्यक्ष झाल्याने विविध प्रश्नांवर या पुढे ठाणे विभागात आंदोलने पाहण्यास मिळतील, असे एका महिला पदाधिकाऱ्याने ‘ठाणेवैभव’ला सांगितले.