शिवसेनेतील नवीन-जुने वाद चव्हाट्यावर; रेपाळे-फाटक भांडण पालकमंत्र्यांच्या दारी

ठाणे : महापालिकेच्या निवडणुकीआधीच वागळे इस्टेटमध्ये शिवसेनेत जुने-नवीन असा वाद निर्माण झाला असून काल विकास रेपाळे आणि नम्रता फाटक यांच्यात झालेले भांडण पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कानावर गेले आहे. काल आलेल्यांनी मला शिवसेना शिकवू नये, असे प्रत्युत्तर रेपाळे यांनी पत्रकार परिषदेत दिले आहे.

शिवसेनेचे माजी नगरसेवक विकास रेपाळे आणि नम्रता फाटक यांच्यामधील वाद अधिक चिघळला असून माझ्या अंगावर आलात तर मी शिंगावर घेतल्याशिवाय राहणार नाही, असा थेट इशाराच रेपाळे यांनी फाटक यांना दिला आहे. काल आलेल्यांनी मला शिवसेना शिकवण्याची गरज नसून माझ्या अंगावर धावून जाणे हा पूर्वनियोजित कट असल्याचा आरोप त्यांनी फाटक यांच्यावर केला आहे. हा सर्व प्रकार आपण पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कानावर देखील घातला असून पालकमंत्री आणि माजी महापौर नरेश म्हस्के जे सांगतील तशाप्रकारची भूमिका घेणार असल्याचे रेपाळे यांनी स्पष्ट केले आहे.

प्रभागात सौंदर्यीकरणाचे काम सुरू असून त्याला अडथळा निर्माण होणार होणार असल्याने सुरू असलेले काम थांबवण्याचे मी सांगितले. त्यावर फाटक या माझ्या अंगावर धावून आल्या. व्हायरल झालेल्या व्हिडिओत बदल करण्यात येऊन मला बदनाम करण्याचा प्रयत्न करण्यात येत असल्याचा आरोप रेपाळे यांनी पत्रकार परिषदेत केला आहे. नम्रता फाटक या आमदार रवींद्र फाटक यांच्या नातेवाईक असल्याने फाटक यांनाच हा इशारा मानला जात असल्याची चर्चा आहे.

प्रभाग क्रमांक १९ च्या नगरसेविका नम्रता फाटक यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने लुईसवाडी आणि तीन हात नाका परिसरात बॅनर्स लावण्यात आले होते. हे बॅनर फाडण्यात आल्यानंतर स्थानिक राजकारणामुळेच हा प्रकार झाला असल्याची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात सुरु झाली होती. दरम्यान हा प्रकार झाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी माजी नगरसेवक विकास रेपाळे आणि माजी नगरसेविका नम्रता फाटक यांच्यातील हमरी तुमरीचा व्हिडीओ व्हायरल झाला.