आयपीएलच्या पंधराव्या हंगामातील ४९ व्या लढतीत बंगळुरुने चेन्नईला १३ धावांनी धूळ चारली. महेंद्रसिंह धोनी, रविंद्र जाडेजा यांच्यासारखे दिग्गज फलंदाज आपली कमाल दाखवू न शकल्यामुळे चेन्नईला पराभवाचा सामना करावा लागला. तर दुसरीकडे बंगळुरुच्या गोलंदाजांनी चेन्नईच्या फलंदाजांना बांधून ठेवल्यामुळे बंगळुरुचा विजय सोपा झाला. बंगळुरुने चेन्नईला विजयासाठी १७४ धावांचे लक्ष्य दिले होते. मात्र वीस षटके संपेपर्यंत चेन्नई संघ फक्त १६० धावा करु शकला. या विजयासह आता बंगळुरुच्या प्लेऑफपर्यंत पोहोचण्याचा आशा पल्लवित झाल्या आहेत. तर दुसरीकडे चेन्नई संघ प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर पडण्याच्या मार्गावर आहे.
बंगळुरुने चेन्नईला विजयासाठी १७४ धावांचे लक्ष्य दिले. मात्र ही धावसंख्या गाठताना चेन्नईची पूर्णपणे धांदल उडाली. डेवॉन कॉन्वे वगळता चेन्नईचा एकही फलंदाज मोठी खेळी खेळू शकला नाही. सलामीला आलेल्या कॉन्वेने ३७ चेंडूंमध्ये ५६ धावा केल्या. तर कॉन्वेसोबत आलेला ऋतुराज गाडकवाड २३ चेंडूंमध्ये २८ धावा करु शकला. दुसऱ्या विकेटसाठी आलेला रॉबिन उथप्पा अवघी एक धाव करुन झेलबाद झाल्यामुळे संघ अडचणीत आला.
तिसऱ्या विकेटसाठी आलेला अंबाती रायडूदेखील आपली कमाल दाखवू शकला नाही. त्याने अवघ्या दहा धावा केल्या. मॅक्सवेलच्या चेंडूवर तो त्रिफळाचित झाला. त्यानंतर मोईन अलीने संघाला सावरण्याचा प्रयत्न केला. त्याने काही मोठे फटके मारत २७ चेंडूंमध्ये ३४ धावा केल्या. मात्र हर्षल पटेलच्या चेंडूवर तो झेलबाद झाला. त्यानंतर मात्र फिनिशर म्हणून ओळख असलेला महेंद्रसिंह धोनी फक्त दोन धावा करु शकला. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न करताा तो अवघ्या दोन धावांवर झेलबाद झाला. धोनी बाद झाल्यानंतर चेन्नईच्या विजयाच्या आशा मावळल्या. रविंद्र (३), ड्वेन प्रिटोरिअकस (१३), खास कामगिरी करु शकले नाहीत. वीस षटके संपेपर्यंत चेन्नईला फक्त १६० धावा करता आल्या. परिणामी बंगळुरुचा विजय झाला.याआधी चेन्नईने नाणेफेक जिंकून सुरुवातीला गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर सुरुवातीला बंगळुरुची विराट कोहली आणि कर्णधार फॅफ डू प्लेसिस ही जोडी फलंदाजी सलामीला आली. या जोडीने चांगली सुरुवात केली. मात्र हे दोन्ही आघाडीचे फलंदाज खास खेळी करु शकले नाहीत. संघाच्या ६२ धावा झालेल्या असताना फॅफ डू प्लेसिस ३८ धावांवर झेलबाद झाला. त्याला मोईन अलीने बाद केले.
त्यानंतर कोहलीदेखील मैदानावर जास्त तग धरु शकला नाही. ३० धावांवर असताना तो मोईन अलीच्या चेंडूवर त्रिफळाचित झाला. त्यानंतर दुसऱ्या विकेटसाठी आलेला ग्लेन मॅक्सवेल चांगली खेळी करु शकला नाही. तो अवघ्या तीन धावा करुन धावबाद झाला. मात्र मधल्या फळीतील महिपाल लॅमरॉर (४२), रजत पाटीदार (२१), दिनेश कार्तिक (२६) या त्रिकुटाने संघाला सावरले. शेवटच्या फळीतील वानिंदू हसरंगा (१) आणि शाहबाज अहमद (०) धावा करु शकले नाहीत. परिणामी वीस षटके संपेर्यंत बंगळुरुला १७३ धावा करता आल्या. तर गोलंदाजी विभागात बंगळुरुच्या खेळाडूंनी चोख काम केले. हर्षल पटेलने मोईन अली, रविंद्र जाडेजा आणि ड्वेन प्रिटोरिअस अशा दिग्गज फलंदाजांना बाद केलं. त्याने एकूण तीन विकेट्स घेतल्या. ज्याचा बंगळुरुला चांगलाच फायदा झाला. तर ग्लेन मॅक्सवेलने दोन विकेट्स घेतल्या. वानिंदू हसरंगा, जोश हेझलवूड, शाहबाज अहमद यांनी प्रत्येक एक बळी घेतला. ज्यामुळे बंगळुरुला विजयापर्यंत पोहोचता आलं.