ठाणे: ठाण्यातील मारोतराव शिंदे तरण तलावात पोहण्यासाठी इच्छुक तीन हजारावर ठाणेकरांनी अर्ज केले असून त्यापैकी फक्त भाग्यवंतांना प्रवेश मिळणार आहे. उद्या त्याची सोडत काढण्यात येणार असल्याचे समजते.
ठाणे महापालिकेच्या मालकीचा असलेला हा तरण तलाव मध्यवर्ती असल्यामुळे तिथे नेहमीच इच्छुकांची गर्दी असते. गेल्या काही दिवसांपासून ठाणेकर पहाटे पाच वाजल्यापासून तरण तलावाबाहेर रांगा लावून फॉर्म मिळवण्याची धडपड करत होते. सोडत निघाल्यावर जवळजवळ 90 टक्के लोकांच्या पदरी निराशा पडणार आहे. महापालिकेचे ठाण्यात चार तरण तलाव आहेत. त्यापैकी एक कळव्यात, दुसरा पूर्व ठाण्यात आणि तिसरा वागळे इस्टेट तीन हात नाका जवळ आहे, परंतु हे तलाव खासगी संस्थांतर्फे चालवले जात असल्यामुळे त्यांचे दर सर्वसामान्यांना परवडणारे नाहीत तसेच ते घरापासून दूर असल्यामुळे ठाण्यातील नागरिक त्यांना पसंती देत नाहीत. ठाणे शहराची वाढती लोकसंख्या लक्षात घेता महापालिकेने तलावांची संख्या वाढवावी अथवा खासगी संस्थांनी काही काळासाठी सर्वसामान्य जनतेला तरण तलाव खुले करावेत, अशी मागणी होत आहे.