महिलेस मारहाण प्रकरणी पोलीस अधिकार्‍यासह आठ जणांवर गुन्हे

ठाणे: गतीमंद मुलाचा दिव्यांग दाखला काढण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात गेलेल्या महिलेला मारहाण करुन विनयभंग करणार्‍या रुग्णालयातील सहा सुरक्षा रक्षक, एक वैद्यकीय अधिकारी यांच्यावर तसेच या गुन्ह्याचे चित्रिकरण नष्ट करुन गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ करणार्‍या पोलीस उपनिरीक्षकावर न्यायालयाच्या आदेशाने गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दिव्यांग मुलाची माता शबनम रैन आणि दिव्यांग संघटनेचे नेते मोहम्मद युसूफ खान यांनी सलग दोन वर्षे न्यायालयीन लढा दिल्यानंतर हा गुन्हा दाखल झाला आहे. मुंब्रा येथे राहणार्‍या शबनम रैन यांचा मोहम्मद नावेद, (11) हा मुलगा गतीमंद आहे. शबनम रैन यांची आर्थिक परिस्थिती अत्यंत हालाखीची असल्याने गतिमंद मुलाचा सांभाळ करणे त्यांना अशक्य होत असल्याने शासकीय मदत मिळावी, या हेतूने त्या कळवा येथील ठाणे महानगर पालिका संचालित छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयामध्ये फेर्‍या मारत होत्या. यावेळी नावेद याची वैद्यकीय तपासणीदेखील करण्यात आली. या तपासणीमध्ये नावेद 100 टक्के गतिमंद असल्याचे स्पष्ट झाल्याने 4 नोव्हेंबर 2020 रोजी शबनम रैन या आपल्या मुलाला घेऊन रुग्णालयात दाखला घेण्यासाठी गेल्या होत्या. त्यावेळी कर्तव्यावर असलेले वैद्यकीय अधिकारी अशोक गढरी यांनी माझ्याकडे पाल्याचा जन्मपत्र, शिधापत्रिका, वीज बिल, घराचा भाडेकरार आदी कागदपत्रांची मागणी केली.

वास्तविक पाहता, दिव्यांग सुधारणा कायद्यानुसार ओळखीचा पुरावा कोणत्याही एक म्हणून रैन यांनी आधारकार्ड आणि जन्म प्रमाणपत्र आणि निवासाबाबतचा पुरावा कोणताही एक म्हणून शिधापत्रिकेची छायांकित प्रत असे दोन पुरावे देऊन दिव्यांग प्रमाणपत्र मिळत असल्याचे सांगितले. त्यावर वैद्यकीय अधिकारी डॉ. गढरी यांनी म्हणणे ऎकून न घेता शबनम रैन यांना अर्वाच्च भाषेत शिविगाळ केली. या प्रकाराचे शबनम रैन यांनी चित्रिकरण करण्याचा प्रयत्न केला असता, डॉ. गढरी यांच्या सांगण्यावरुन उपस्थित असलेले सुरक्षा रक्षक नरेंद्र पगारे, सुप्रिया शैलेश नाईक, अश्विनी यादव, राहूल जाधव, गणेश पाटील, अमूल कराळे यांनी शबनम रैन यांना मारहाण केली.

या संदर्भात शबनम रैन यांनी कळवा पोलीस ठाणे गाठून तक्रार नोंदविण्याचा प्रयत्न केला असता, तेथे उपस्थित असलेले पोलीस उपनिरीक्षक गिरीश यादव यांनी मोबाईलमधील चित्रिकरण नष्ट केले. त्यानंतर शबनम रैन यांनी सीसीटव्ही फुटेज मिळविले. त्यामध्येही रैन यांना मारहाण झाली असल्याचे स्पष्ट दिसत होते. या संदर्भात रैन यांनी आपल्या मुलासह उपोषणाचा मार्गही अनुसरला होता. मात्र, त्यावर कारवाई न झाल्याने अखिल भारतीय दिव्यांग सेनेचे नेते मोहम्मद युसूफ खान यांनी या प्रकरणी पाठपुरावा केला. अ‍ॅड इस्माईल यांच्यासह ह्यूमन राइट्स लॉ नेटवर्क या विधी संस्थेचे अ‍ॅड. क्रांति, अ‍ॅड. गौरव आणि रूचिता पडवळ यांनी कोणताही आर्थिक मोबदला न घेता या प्रकरणी न्यायालयामध्ये याचिका दाखल केली. त्यावर नुकतीच सुनावणी झाली.

या सुनावणीनंतर आरोग्य अधिकारी अशोक गढरी, सुरक्षा रक्षक नरेंद्र पगारे, सुप्रिया नाईक, अश्विनी यादव, राहूल जाधव, गणेश पाटील, अमूल कराळे यांच्यावर तसेच पुरावे नष्ट केल्या प्रकरणी पोलीस निरीक्षक गिरीश यादव यांच्यावर गुन्हे दाखल करण्याचे आदेश न्यायालयाने दिले.
त्यानुसार कळवा पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.