पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण
ठाणे : ठाणे शहरातील श्रीनगर, वागळे इस्टेट या परिसरात नव्याने कार्यान्वित करण्यात आलेले “नो कॅश काऊंटर” असणारे सुपरस्पेशॅलिटी उपचार व शस्त्रक्रियेच्या अद्ययावत सुविधांयुक्त मातोश्री गंगुबाई संभाजी शिंदे रुग्णालय हे नागरिकांसाठी वरदान ठरेल, असा विश्वास राज्याचे नगरविकास मंत्री तथा ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज व्यक्त केला.
ठाणे महानगरपालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय व प्लॅटिनम हॉस्पिटल प्रा.लि. च्या सहकार्याने उभारण्यात आलेल्या मातोश्री गंगुबाई संभाजी रुग्णालयाचा लोकार्पण सोहळ्यानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. मातोश्री गंगुबाई संभाजी रुग्णालयाचा लोकार्पण सोहळा आज ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे, लता शिंदे आणि संभाजी शिंदे यांच्या हस्ते पार पडला. या लोकार्पण सोहळ्यास खासदार राजन विचारे, डॉ.श्रीकांत शिंदे, महापालिका आयुक्त डॉ.विपीन शर्मा, माजी महापौर नरेश म्हस्के, माजी महापौर मिनाक्षी शिंदे, माजी नगरसेविका संध्या मोरे, माजी नगरसेवक राम रेपाळे, दिलीप बारटक्के, गुरूमुखसिंग स्यान, नगरसेवक प्रकाश शिंदे, योगेश जानकर, अतिरिक्त आयुक्त(१) संदीप माळवी, उप आयुक्त मनिष जोशी, उप आयुक्त शंकर पाटोळे, वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. भीमराव जाधव, प्लॅटिनम हॉस्पिटलचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. संजित पॉल, प्रियांका पॉल, छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. भोर, वैद्यकीय अधिकारी डॉ. राणी शिंदे, डॉ. प्रसाद पाटील आदी उपस्थित होते.
यावेळी बोलताना पालकमंत्री ना. शिंदे म्हणाले की, वागळे, श्रीनगर परिसरातील नागरिकांना या हॉस्पिटलच्या माध्यमातून अद्ययावत सेवासुविधा उपलब्ध करुन देण्यात आल्या आहे. प्लॅटिनम रुग्णालयाच्या सहकार्याने या ठिकाणी १०० बेडस् उपलब्ध करण्यात आले आहे. या रुग्णालयात सुपरस्पेशॅलिटी उपचार व शस्त्रक्रिया करण्यात येणार आहेत, यामध्ये हृदयविकारासंबंधी तपासणी व उपचार, युरोलॉजी व इतर वैद्यकीय सेवांचा समावेश आहे. या रुग्णालयात महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजनेतंर्गत ‘नो कॅश काऊंटर’ पद्धतीनुसार रुग्णांवर मोफत उपचार केले जाणार आहेत. तसेच शस्त्रक्रिया करण्याअगोदरची ओ.पी.डी सेवा आणि वैद्यकीय चाचण्या देखील विनामूल्य करण्यात येणार आहेत याचा फायदा येथील स्थानिक नागरिकांना मोठ्या प्रमाणात होणार आहे.
ठाणे महानगरपालिकेच्या आरोग्य विभागास आयसीआयसीआय बँकेने सीएसआर फंडातून एक पिडीयाट्रिक व एक ॲडल्ट कार्डिॲक रुग्ण्वाहिका उपलब्ध करुन दिली आहे. या रुग्णवाहिकांचे लोकार्पण देखील आज पालकमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आले. सदर रुग्ण्वाहिकांमुळे अत्यवस्थ रुग्णांना संदर्भसेवा देणे सोईस्कर होणार आहे.
ठाणे महानगरपालिका हद्दीतील क्षयरोगाचे रुग्ण लवकर बरे व्हावेत यासाठी महापालिकेच्या माध्यमातून क्षयरुग्णांचे निदान व त्यावरील उपचार हे मोफत केले जात आहेत. क्षयरुग्णांसाठी ठाणे महापालिकेच्या माध्यमातून टीबीमुक्त ॲप तयार करण्यात आले असून हे ॲप तयार करणारी ठाणे ही राज्यातील पहिली महापालिका आहे. या ॲपचे देखील आज पालकमंत्र्यांच्या हस्ते उदघाटन करण्यात आले.
हायराईझ फायर फाईटिंग व्हेईकल अग्निशमन दलाच्या ताफ्यात
ठाणे शहरात वाढत असलेल्या उंच इमारती व त्या ठिकाणी निर्माण होणारी आपत्कालीन परिस्थिती व त्या परिस्थितीला तोंड देण्यासाठी ठाणे अग्निशमन दलाच्या वाहन ताफ्यामध्ये नव्याने अत्याधुनिक ‘हाय राईझ फायर फायटिंग व्हेईकलचा’ समावेश करण्यात आला असून या हायराईझ फायर फाईटिंग व्हेईकलचे लोकार्पण देखील आज पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते बाळकुम अग्निशमन केंद्र येथे करण्यात आले. या फायर वाहनांचा अग्निशमन वाहन ताफ्यात समावेश झाल्याने अग्निशमन विभागाची कार्यक्षमता वाढणार आहे.