रस्त्यांच्या गुणवत्तेवर पालकमंत्र्यांची करडी नजर

ठाणे : मागील पावसाळ्यात ज्या प्रमाणे रस्त्यांची दुर्दशा झाली होती, तशी परिस्थिती या वर्षी पुन्हा होऊ नये या करिता पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी चांगल्या दर्जाचे रस्ते तयार करण्याच्या सूचना दिल्या आहेत. दर्जेदार रस्ते झाले की नाहीत याची पाहणी करण्यासाठी वेगळे पथक तैनात करण्याचे आदेश दिले आहेत.

पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली आज कृषी विभागाची बैठक झाली होती. त्यानंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत श्री. शिंदे म्हणाले की पावसाळ्यापूर्वी जिल्ह्यातील महापालिका नगरपालिका आणि एमएसआरडीसी विभागाच्या अधिकाऱ्यांना आवश्यक कामे पूर्ण करण्याचे आदेश दिले आहेत. पावसाळ्यात रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात खड्डे पडतात, त्यामुळे वाहतूक कोंडी होऊन नागरिकांना त्रास सहन करावा लागतो. तशी परिस्थिती पुन्हा निर्माण होऊ नये यासाठी रस्ते दर्जेदार करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. रस्त्यांची कामे दर्जेदार झाली की नाही याची तपासणी करण्यासाठी दोन पथके तैनात करण्याचे आदेश श्री. शिंदे यांनी दिले आहेत, त्यामुळे पावसाळ्यात जिल्ह्यातील प्रमुख रस्ते चकचकीत राहतील, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

खरीप हंगामातील कामे पूर्ण करावीत, जिल्ह्यातील तलावामधील गाळ काढणे, तलावाची रुंदी वाढविणे तसेच खोली करण्याचे आदेश दिले असल्याचे श्री. शिंदे यांनी सांगितले.