ठाणे : कोविड प्रादुर्भावामुळे मागील दोन वर्ष जिल्ह्यातील अंगणवाड्या बंद होत्या, मात्र आता कोविडची परिस्थिती नियंत्रणात असल्याने शासनाने दिलेल्या निर्देशानुसार आणि मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. भाऊसाहेब दांगडे यांच्या मार्गदर्शनाखाली २९ एप्रिल २०२२ पासून जिल्ह्यातील १८९४ अंगणवाड्या प्रत्येक्ष सुरु करण्यात आल्याची माहिती महिला व बाल विकास विभागाचे जिल्हा कार्यक्रम अधिकारी संजय बागुल यांनी दिली.
दोन वर्षानंतर अंगणवाड्या सुरु झाल्याने अनेक ठिकाणी अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांनी मुलांचे स्वागत गुलाबपुष्प, औक्षण करून केले. त्यामुळे सकाळपासून अंगणवाड्यामध्ये आनंददायी वातावरण पाहायला मिळाले.
जिल्ह्यात एकात्मिक बाल विकास सेवा प्रकल्प अंतर्गत मुरबाड, शहापूर, अंबरनाथ, कल्याण, भिवंडी या पाच तालुक्यातील नऊ प्रकल्पांतर्गत अंगणवाड्यांचे कामकाज चालते. यामध्ये १५९६ नियमित तर २९८ मिनी अंगणवाड्याचा समावेश आहे. शासनाने कोविडमुळे प्रत्यक्ष अंगणवाडी सुरु ठेवण्यास मनाई केली होती. त्यामुळे मागील दोन वर्ष अंगणवाड्या बंद होत्या, परंतु मुलांना नियमित मिळणारा आहार मात्र अंगणवाडी सेविकांमार्फत मुलांना घरपोच मिळत होता. त्यामुळे अंगणवाडी प्रत्यक्ष सुरु नसली तरी अंगणवाडीमार्फत मिळणाऱ्या काही सेवा मात्र सुरळीत सुरु होत्या.
अंगणवाड्या सुरु होणार असल्याने आदल्या दिवशी अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांनी स्वच्छता आणि सजावट करून मुलांना प्रसन्न वाटेल असे वातावरण तयार केले होते. त्यामुळे आज आनंदी चेहऱ्यांनी मुलांनी प्रवेश केला. उल्हासित वातावरणात हा प्रवेश सर्वत्र पाहायला मिळाला. जिल्ह्यातील अनेक भाग दुर्गम,अतिदुर्गम तसेच आदिवासी भागात मोडतात. अशा अनेक दुर्गम भागात अंगणवाड्यांमुळे शिक्षणाचे बाळकडू मुलांना मिळत आहे.