मुंबई पोलीस अ आणि डब्ल्यु.एन.एस. संघ विजयी

आदित्य निकमने गाजवला दिवस

ठाणे : ठाणेवैभव वासंतिक क्रिकेट करंडक स्पर्धेच्या अ गटातील पहिल्या फेरीत झालेल्या सामन्यात मुंबई पोलीस अ संघाने टेलीपरफॉर्मन्स ग्लोबल सर्व्हिसेस संघाचा चार गडी राखून पराभव केला. तर दुसऱ्या सामन्यात आदित्य निकमच्या ९२ धावांच्या जोरावर डब्ल्यु.एन.एस. ग्लोबल सर्व्हिसेस ब या संघाने सीएट संघाचा पराभव केला.

सेंट्रल मैदानात झालेल्या सामन्यात टेलीपरफॉर्मन्स संघाने नाणेफेक जिंकून फलंदाजी स्वीकारली. मात्र १८.४ षटकांतच संपूर्ण संघ १२१ धावा करून तंबूत परतला. यात सुनील लिंगायत याने आठ चौकारांच्या मदतीने सर्वाधिक ४४ धावा केल्या. मुंबई पोलीस संघाकडून प्रशांत मोरे याने चार षटकांत २४ धावा देत दोन बळी घेतले. तर अमोल तनपुरे, योगेश पाटील, पंकज परदेशी आणि स्वप्नील कुळये यांनी प्रत्येकी एक बळी घेतला.

टेलीपरफॉर्मन्स संघाचे आव्हान मुंबई पोलीस संघाने १९.१ षटकांत पार केले. सहा गडी गमावून मुंबई पोलिसांनी १२४ धावा केल्या. यात अर्जुन देशमुख -३४, मानसिंग चव्हाण ३० आणि सुनील पाटील याचा २८ धावांचा समावेश आहे. टेलीपरफॉर्मन्स संघाकडून दीपक लाड याने दोन बळी घेतले.

दुसऱ्या सामन्यात डब्ल्यु.एन.एस. ग्लोबल सर्व्हिसेस ब संघाने नाणेफेक जिंकून सीएट संघाला फलंदाजीसाठी निमंत्रित केले. सीएटच्या के. कृष्णन याच्या ६० धावा वगळता उर्वरित सर्व फलंदाजांना मोठी कामगिरी करता आली नाही. सीएटने १९.५ षटकांत सर्व गडी गमावून १३४ धावांचे आव्हान दिले.

डब्ल्यु.एन.एस. ग्लोबल सर्व्हिसेस ब संघाने हे आव्हान अवघ्या १३.२ षटकांत दोन गडी गमावून पार केले. डब्ल्यु.एन.एस.च्या आदित्य निकमने १५ चौकार आणि चार षटकारांच्या मदतीने ९२ धावा करून संघाला विजयाजवळ नेले.