भाईंदर : मीरा-भाईंदर महापालिकेत कित्येक वर्षांहून अधिक काळ कनिष्ठ अभियंता पदावर कार्यरत असलेले 10 अभियंत्यांना शाखा अभियंता पदावर तर अग्निशमन दलातील तीन सहाय्यक केंद्र अधिकाऱ्यांना केंद्र अधिकारी पदावर पदोन्नती देत आयुक्त दिलीप ढोले यांनी या अधिकाऱ्यांना चांगलीच भेट दिलेली आहे. या पदोन्नतीबाबत सर्वांनी समाधान व्यक्त केले आहे.
पालिकेतील सार्वजनिक बांधकाम विभागातील कनिष्ठ अभियंते गेल्या अनेक वर्षांपासून शाखा अभियंता पदावरील पदोन्नतीच्या प्रतिक्षेत होते. वास्तविक तीन वर्षांच्या कार्यकाळानंतर त्यांनी संबंधित व्यावसायिक परिक्षा उत्तीर्ण केल्यानंतर त्यांना शाखा अभियंता पदावर पदोन्नती मिळणे अपेक्षित असताना त्यांना प्रशासनाकडून पदोन्नती देण्यात येत नव्हती. याच पदोन्नतीच्या माध्यमातून सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता दीपक खांबित यांच्यावर गोळीबार झाल्याची घटना घडली. त्यात नगररचना विभागातील कनिष्ठ अभियंता श्रीकृष्ण मोहिते व यशवंत देशमुख यांचा समावेश होता.
अलिकडेच त्यांची जामिनावर मुक्तता झाली असून असे हल्ले यापुढे इतर अधिकाऱ्यांवर होऊ नयेत. याकरीता मोहिते आणि देशमुख यांना पदोन्नतीपासून डावलण्यात आले आहे. पदोन्नतीच्या प्रतिक्षेत असलेल्या अन्य प्रत्येक अभियंत्याला त्यांच्या हक्काच्या पदोन्नतीपासून वंचित न ठेवता आयुक्त दिलीप ढोले व उपायुक्त मारुती गायकवाड यांनी पीडब्ल्यूडी विभागातील पदोन्नतीच्या प्रतिक्षेत असलेले कनिष्ठ अभियंते सतिश तांडेल, यतीन जाधव, उत्तम रणदिवे, राजेंद्र पांगळ, भुपेश काकडे, अरविंद पाटील, सचिन पाटील, शिरीषकुमार पवार, प्रांजल कदम, उमेश अवचर यांना शाखा अभियंता पदावर पदोन्नती दिली. यातील यतीन जाधव व सतिश तांडेल यांच्याकडे प्रशासनाने यापुर्वीच उपअभियंता पदाचा प्रभारी कार्यभार सोपविला आहे.
त्याचप्रमाणे अग्निशमन दलातील सहाय्यक केंद्र अधिकारी प्रकाश बोराडे, दिलीप रणावरे व धनंजय कनोजे हे केंद्र अधिकारी पदावरील पदोन्नतीपासून वंचित राहिले होते. त्यांना देखील आयुक्तांनी पदोन्नती दिली. यातील प्रकाश बोराडे यांच्याकडे प्रशासनाने यापुर्वीच अग्निशमन दलाच्या प्रभारी मुख्य अधिकारी पदाचा कार्यभार सोपविण्यात आला आहे. या सर्वांनी उशीरा का होईना अखेर पदोन्नती मिळाल्याने त्यांनी वर्ग 3 मधून वर्ग 2 मध्ये समावेश झाल्याचे समाधान व्यक्त केले.