राज ठाकरेंची तोफ धडाडणार
औरंगाबाद : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या औरंगाबादमधील सभेला अखेर परवानगी मिळाली आहे. ही परवानगी देत असताना राज ठाकरे यांना पोलीस प्रशासनाकडून १५ अटी घालण्यात आल्या आहेत. या अटींचे पालन करून १ मे या महाराष्ट्र दिनी राज ठाकरे यांना आता आपले विचार व्यक्त करता येणार आहेत. ही परवानगी मिळाल्यामुळे मनसेमध्ये आनंदाचे वातावरण आहे.
सभेसाठी पोलिसांनी घातलेल्या अटी
राज ठाकरे यांनी ही जाहीर सभा १ मे २०२२ रोजी सध्याकाळी साडे चार वाजता या वेळेतच आयोजित करावी. कार्यक्रमाचे ठिकाण व वेळेत कोणत्याही प्रकारचा बदल करू नये. सभेत सहभागी होणाऱ्या नागरिकांनी स्वयंशिस्त पाळावी. सभेला येताना व परत जाताना कोणीही आक्षेपार्ह घोषणाबाजी, हुल्लडबाजी. असभ्य वर्तन करणार नाही याची दक्षता घ्यावी. सभेसाठी बोलावलेल्या सर्व वाहनांना पोलिसांनी दिलेल्या मार्गाने प्रवास करण्याचा व मार्ग न बदलण्याच्या सूचना द्याव्या. त्या वाहनांनी शहरात व शहराबाहेर प्रवासादरम्यान त्या-त्या रस्त्यावर विहीत वेगमर्यादेचे पालन करावे. सभेला आलेल्या नागरिकांना त्यांची वाहने पार्किंगसाठी निर्धारि केलेल्या ठिकाणीच पार्किंग करण्याच्या सूचना द्याव्यात. सभेसाठी येताना अथवा परत जाताना कोणत्याही प्रकारे मोटारसायकल, कार रॅली काढू नये. त्याच प्रमाणे राज ठाकरे यांना अधिकृत सुरक्षा पुरविण्यात आली असून आयोजकांनी त्यांच्या सभेच्या ठिकाणी येण्याच्या व सभेवरून जाण्याच्या वेळी कोणतीही रॅली काढू नये. कार्यक्रमादरम्यान कोणतेही शस्त्र, तलवारी, स्फोटक पदार्थ बाळगू नये किंवा त्यांचे प्रदर्शन करू नये व शस्त्र अधिनियमातील तरतुदींचा भंग करू नये. अट क्रमांक २, ३ व ४ बाबत सभेत सहभागी होणाऱ्या नागरिकांना कळविण्याची जबाबदारी संयोजकांची राहील. सभेच्या कार्यक्रमात स्वयंसेवक नेमण्यात यावेत. त्यांची नावे, मोबाईल क्रमांक, तसेच सभेसाठी औरंगाबाद शहराच्या बाहेरून निमंत्रित करण्यात आलेल्या नागरिकांच्या वाहनांची शहर/ गावांना अनुसरून संख्या, त्यांच्या येण्याचा व जाण्याचा मार्ग, येणाऱ्या लोकांची अंदाजे संख्या ही माहिती सभेच्या एक दिवस अगोदर पोलीस निरीक्षक, सिटीचौक यांच्याकडे देण्यात यावी.