महोत्सवातून ठाणेकरांना मिळणार दर्जेदार हापूस आंबा
संस्कार-कोकण विकास प्रतिष्ठानचा १ मेपासून आंबा महोत्सव
ठाणे: नैसर्गिक आपत्तीमुळे कोकणात २०१९ पासून हापूस आंब्याचे उत्पादन जवळपास दोन लाख मेट्रिक टनाने घटले असून आंबा उत्पादक पिचला आहे. या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना थेट ग्राहक आणि ग्राहकांना स्वस्तात दर्जेदार हापूस आंबा मिळावा यासाठी आमदार संजय केळकर यांच्या मार्गदर्शनाखाली सलग १५व्या वर्षी आंबा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.
कोरोनाचा प्रादुर्भाव ओसरल्यानंतर यंदा निर्बंधमुक्त आंबा महोत्सवाची धूम ठाणेकरांना अनुभवता येणार आहे. संस्कार आणि कोकण विकास प्रतिष्ठान आयोजित आंबा महोत्सव यंदा १ मे ते १२ मे या कालावधीत नौपाड्यातील भगवती मैदानात होणार असून कोकणातील अस्सल हापुस आंब्याची चव खवय्यांना चाखता येणार आहे,अशी माहिती संस्कार संस्थेचे अध्यक्ष आमदार संजय केळकर यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी कोकण विकास प्रतिष्ठानचे राजेंद्र तावडे, संस्कार संस्थेचे सीताराम राणे, संतोष साळुंखे, परिवहन सदस्य विकास पाटील उपस्थित होते.
ठाणे शहराचे आमदार संजय केळकर यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र राज्य कृषी विभाग आणि पणन मंडळ पुरस्कृत संस्कार व कोकण विकास प्रतिष्ठानच्यावतीने दरवर्षी आंबा महोत्सवाचे आयोजन करण्यात येते. यंदा या महोत्सवाचे १५ वे वर्ष आहे. या आंबा महोत्सवाच्या माध्यमातून कोकणातील आंबा उत्पादक शेतकरी आणि ग्राहकांची थेट भेट होऊन लाखोंची उलाढाल होत असते. यात शेतक-यांना फायदा होतोच शिवाय ठाण्यातील ग्राहकांना कोकणातील अस्सल हापूस आंबा योग्य दरात मिळतो.
यंदा नैसर्गिक आपत्तीमुळे आंब्याचे उत्पादन घटले आहे. २०१९ ला तीन लाख २० हजार मेट्रिक टन, २०२० ला दोन लाख ५६ हजार मेट्रीक टन आणि २०२१ ला एक लाख २८ हजार मेट्रीक टन आंबा उत्पादन झाले आहे.
गेल्या चार वर्षांपासून शेतकरी पिचुन गेला आहे, मात्र सरकारच्या उदासीनतेमुळे शेतकरी व्यथित आहे. नुकसानीचे पंचनामे झाले, परंतु अद्याप नुकसान भरपाईच दिलेली नाही. या शेतकऱ्यांना पाठबळ देण्यासाठी हा आंबा महोत्सव आयोजीत केला असल्याचे आ. संजय केळकर यांनी सांगितले.
कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे गेली दोन वर्षे आंबा महोत्सव आयोजित करता न आल्याने ऑनलाईन विक्री दवारे ‘आंबा आपल्या दारी’ हा उपक्रम सुरु करण्यात आला होता. यावर्षी भगवती मैदानात आंबा महोत्सवात प्रत्यक्ष विक्री सोबतच ऑनलाईन विक्रीची सुविधाही उपलब्ध ठेवल्याचे आमदार संजय केळकर यानी सांगितले. यासाठी मुंबई-ठाण्यातील खवय्यांनी राजेंद्र तावडे ९८६९०१६०९२ आणि दिनेश मांजरेकर यांच्याशी ९८१९०९७६५० या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन आ. केळकर यांनी केले आहे.
दापोली कृषी विद्यापीठाच्यावतीने आंबा महोत्सव स्थळी आंब्याच्या विविध प्रजातींचे प्रदर्शन आयोजीत केले आहे. या प्रदर्शनाच्या माध्यमातुन आंबा व त्याच्या प्रजातींविषयी दुर्मिळ माहिती नागरीकांना मिळणार आहे.