अरुप्रीत टायगर्सचा सारस्वत बँकेवर विजय

ठाणे : ठाणेवैभव वासंतिक क्रिकेट करंडक स्पर्धेच्या ब गटातील आठवा सामना सारस्वत बँक आणि अरुप्रीत टायगर्स या दोन संघात झाला. ही लढत अरुप्रीत टायगर्स संघाने सहज जिंकली.

नाणेफेक जिंकलेल्या सारस्वत बँक संघाने प्रथम फलंदाजी स्वीकारली, मात्र अरुप्रीत टायगर्स संघाच्या भेदक गोलंदाजीपुढे सारस्वत बँकेचा संघ मोठे आव्हान उभे करू शकला नाही. २० षटकांत फक्त ११० धावा केल्या. रणजित नलावडे याने नाबाद सर्वाधिक २८ तर अभिजित क्षीरसागर याने २१ धावा केल्या. अरुप्रीत टायगर्स संघाच्या वतीने सर्वाधिक तीन बळी सीमांत दुबे याने घेतले तर तुषार चाटे आणि सिद्धेश गावंडे यांनी प्रत्येकी दोन बळी घेतले.

सारस्वत बँकेचे ११० धावांचे आव्हान अरुप्रीत टायगर्स संघाने सहज पेलले. फक्त ९.४ षटकांत आठ गडी राखून १११ धावा करून विजय मिळवला. अजय सिंघम याने पाच चौकार आणि तीन षटकारांच्या मदतीने ४६ तर आकाश जांगीड यानेही पाच चौकार आणि तीन षटकार ठोकत ४२ धावा केल्या.