बिल थकवल्याने ठेकेदाराने काम थांबवले
कल्याण : शहरातील ओल्या कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी पालिका प्रशासनाने उभारलेल्या उंबर्डे प्रकल्पामध्ये कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी ठेकेदाराची नियुक्ती करण्यात आली आहे. या ठेकेदाराला कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी पालिका प्रशासनाकडून दरमहा खर्च दिला जातो, मात्र डिसेंबरपासून पालिका प्रशासनाकडून ठेकेदाराचे बिल देण्यात आलेले नसल्याने चार कोटी १५ लाख रुपयांचे बिल थकले आहे.
प्रकल्प चालविण्यासाठी लागणाऱ्या डिझेलच्या किमती दिवसागणिक वाढत असताना बिल थकल्याने ठेकेदाराला डिझेल क्रेडिटवर मिळत नसल्याचे ठेकेदाराचे म्हणणे आहे. दरम्यान पालिका प्रशासनाकडे वारंवार मागणी करुनही पालिका प्रशासनाकडून केलेल्या कामाचे बिल दिले जात नसल्याने ठेकेदाराने कामबंदचे हत्यार उपसले आहे. मंगळवार सकाळपासून कचरा प्रक्रिया प्रकल्प बंद करत कचऱ्याच्या गाड्यांना प्रवेश बंद केल्याने भरलेल्या कचऱ्याच्या गाड्यांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत.
जोपर्यंत थकलेले बिल मिळत नाही तोपर्यंत काम सुरू करणार नसल्याची भूमिका ठेकेदाराने घेतल्याने शहरात कचऱ्याची भीषण समस्या निर्माण होण्याची शक्यता आहे.