ठाण्यात प्रथम सोनू निगमचा लाईव्ह कॉन्सर्ट; संघर्ष संस्थेच्या वतीने आयोजन

 

ठाणे: गेले दोन वर्षे कोरोनामुळे घरातच बंदीस्त झालेल्या ठाणेकरांना शनिवारी जल्लोष करण्याची संधी गृहनिर्माण मंत्री ना. डॉ. जितेंद्र आव्हाड प्रणित ‘संघर्ष’ या संस्थेमुळे मिळणार आहे. खारीगाव येथील 90 फूट रोडवर “सोनू निगम लाईव्ह 2022’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाच्या निमित्ताने प्रख्यात गायक सोनू निगम हा प्रथमच ठाण्यात आपल्या कलेचे प्रदर्शन करणार आहे.

कोरोनामुळे सर्वच नागरिक बेजार झाले होते. सार्वजनिक कार्यक्रमांवरील निर्बंधांमुळे नागरिकांना जल्लोष साजरा करणे शक्य होत नव्हते. आता कोरोनाचे संकट टळले आहे.आणि राज्य सरकारने देखील सार्वजनिक ठिकाणी पाळावयाचे निर्बंध उठवले आहेत.त्यामुळेच ‘संघर्ष’च्या वतीने सोनू निगम लाईव्ह 2022 हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. शनिवार, दि. 30 एप्रिल 2022 रोजी सायंकाळी 6.30 ते 10 या वेळात 90 फूट रोड,खारीगाव येथे हा कार्यक्रम होणार आहे. सोनू निगम या सुप्रसिद्ध गायकाचा लाईव्ह परफॉर्मन्ससह विविध कलांचा अविष्कार आपणाला येथे अनुभवता येणार आहे. या कार्यक्रमास मोफत प्रवेश आहे.

दरम्यान, सोनू निगम प्रथमच ठाण्यात शो करत असल्याने या कार्यक्रमाबद्दल उत्सुकताही ताणली गेली आहे. या कार्यक्रमास ठाणेकरांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून जल्लोष साजरा करावा, असे आवाहन संघर्षच्या वतीने करण्यात आले आहे.