पाच ते सहा दुकाने जळाली, ३० पेक्षा अधिक दुचाकी पेटल्या

नालासोपारा पश्चिमेला अग्नितांडव

नालासोपारा : पश्चिमेकडील गॅलक्सी हॉटेल शेजारील दुकानांना लागलेल्या आगीत पाच ते सहा दुकाने जळून खाक झाली असून पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या दुचाकींचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

सोमवारी दुपारी चार वाजताच्या सुमारास येथील एका गादीच्या दुकानाला आग लागली. या दुकानात असलेला कापूस व कपड्यामुळे ही आग वाढत गेली व आजूबाजूला असलेली आठ ते दहा दुकानेही या घटनेत जळाली. या दुकानाच्या मागे असलेल्या पार्किंगमध्येही आग पसरल्याने ३० ते ३५ दुचाकी जळून खाक झाल्या आहेत. यावेळी वेळी नागरिकांनी प्रसंगावधन दाखवत पार्किंगमधल्या दुचाकी बाहेर काढल्या अन्यथा अनेक गाड्या या आगीत जळून खाक झाल्या असत्या.

या घटनेची माहिती वसई पालिकेच्या अग्निशमन पथकाच्या जवानांना मिळाल्यानंतर त्यांनी घटनास्थळी पोहचून आगीवर नियंत्रण मिळविले मात्र या आगीत लाखो रुपायांचे नुकसान झाले आहे.