कल्याण : कल्याण-डोबिवली महानगरपालिकेतील सर्वच महत्त्वाच्या पदावर शासनाने प्रतिनियुक्तीवर अधिकाऱ्यांची नियुक्ती केली आहे, त्यामुळे पालिकेचा बहुतांशी कारभार या अधिकाऱ्यांच्या हाती गेल्याचे दिसून येत आहे.
पालिकेच्या अधिकाऱ्यांना वेळच्या वेळी पदोन्नती मिळाली नसल्याने तसेच अधिकारी वर्गातील एकमेका विरोधातील अंतर्गत हेव्यादाव्यामुळे पालिकेच्या अधिकाऱ्यांना महत्त्वाच्या पदावर नियुक्तीपासून वंचित राहावे लागले आहे. त्यामुळे पालिकेच्या अतिरिक्त आयुक्त पदापासून थेट सहाय्यक नगर रचनाकार पदापर्यंतच्या महत्त्वाच्या पदावर शासनाने प्रतिनियुक्तीवर वर अधिकाऱ्याची नियुक्ती केली आहे.
कडोंमपाने सद्यस्थितीत तब्बल १५ प्रतिनियुक्तीवर अधिकाऱ्यांची नियुक्ती केली असून आणखी तीन शासनाच्या अधिकाऱ्यांची प्रतिनियुक्तीवर नियुक्ती केली आहे. सध्या पालिकेत १८ प्रतिनियुक्तीवर नियुक्ती केलेले अधिकारी आहेत. पालिकेच्या महत्त्वाच्या खात्याचा पदभार प्रतिनियुक्तीवर वरील अधिकाऱ्याकडे सोपविला असल्याने पालिकेचा कारभार प्रतिनियुक्तीवरील अधिकारीच हाकताना दिसून येत आहे. पालिकेतील महत्त्वाचे पद असलेल्या सहाय्यक आयुक्त पदावर पालिकेच्या एकाच अधिकाऱ्याची वर्णी लागली आहे.
कल्याण-डोंबिवलीतील अतिरिक्त आयुक्त, उपायुक्त व सहाय्यक आयुक्त तसेच पालिकेतील महत्त्वाच्या विभागाच्या पदासाठी शासनाने प्रतिनियुक्तीवर नियुक्त केलेले व पालिकेच्या अधिकाऱ्यांसाठी पदे मंजूर करण्यात आलेली आहेत. पालिकेच्या अधिकारी वर्गातून भरल्या जाणाऱ्या या पदासाठी पालिकेतील अधिकाऱ्यांना पदोन्नती देऊन ही पदे भरायची होती, मात्र पालिका प्रशासनाच्या त्यावेळीच सेवा भरतीच्या चुकीच्या नियमामुळे तसेच वेळच्या वेळी पदोन्नती न दिल्याने त्यातच अधिकारी वर्गातील अंतर्गत हेव्यादाव्यामुळे पालिकेच्या पात्र अधिकाऱ्यांना मानाच्या पदापासून वंचित राहावे लागले.
पालिकेच्या अतिरिक्त आयुक्त पदासाठी दोन पदे असून त्यातील एक शासन नियुक्त अधिकारी व एक पालिकेच्या अधिकारी वर्गासाठी मंजूर आहेत. या पदासाठी शासनाने प्रतिनियुक्तीवर अधिकाऱ्याची नियुक्ती केली आहे. उपायुक्त पदासाठी पालिकेत आठ पदे असून त्यातील चार पदे शासनाचे प्रतिनियुक्तीने तर चार पदे पालिकेच्या अधिकाऱ्यांची भरावयाची होती. मात्र शासनाने या आठही पदावर शासनाने प्रतिनियुक्तीवर अधिकाऱ्यांची नियुक्ती केली तर सहाय्यक आयुक्त पदासाठी २४ पदे असून त्यातील सहा पदे शासनाने प्रतिनिुक्तीवरील अधिकाऱ्याची तर सहा पदे सरळ सेवा भरती जाहिरात देऊन भरायची आहे. उर्वरित १२ पदे पालिकेच्या अधिकाऱ्यांमधून भरायची अशी २४ पदे मंजुर करण्यात आली आहेत. पालिकेच्या सहाय्यक आयुक्त पदासाठी शासनाची सहा पदे असून त्यापैकी शासनाने प्रतिनियुक्तीवर तीन अधिकाऱ्यांची नियुक्ती केली आहे. पालिकेच्या अधिकाऱ्यांना मंजुरी असलेल्या बारा पदांपैकी संदीप रोकडे या पालिकेच्या एकाच अधिकाऱ्याची सहाय्यक आयुक्तपदी अधिकृतपणे वर्णी लागली असून पालिकेच्या नऊ प्रभाग समितीचे प्रभाग समिती अधिकारी पद हे सहाय्यक आयुक्त पदाच्या सम कक्षातील असल्याने या नऊ प्रभागांच्या प्रभाग अधिकाऱ्यांना प्रभारी सहाय्यक आयुक्त पद सोपविण्यात आले आहे. पालिकेत सहाय्यक आयुक्तपदी शासनाचे तीन अधिकारी प्रतिनियुक्तीवर पाठविण्यात आले आहेत.
शासनाने प्रतीनियुक्तीवर पाठवलेल्या अधिकाऱ्याकडे महत्त्वाची पदे आहेत. सुनील पवार यांच्याकडे पालिकेच्या अतिरिक्त आयुक्त पदाचा पदभार आहे तर पालिकेतील उपायुक्त पदी शासनाने आठ प्रतिनियुक्तीवर नियुक्त केलेल्या अधिकाऱ्याकडे पालिकेच्या महत्वाचा पदभार आहे. सद्यस्थितीला पालिकेत अठरा प्रतिनिुक्तीवरील अधिकारी पालिकेच्या महत्त्वाच्या खात्याचा पदभार सांभाळत आहेत. यामध्ये सुनील पवार अतिरिक्त आयुक्त, तर उपायुक्तपदी बाळासाहेब चव्हाण, सुधाकर जगताप, अनंत कदम, अर्चना दवे, पल्लवी भागवत तर नव्याने तीन अधिकाऱ्यांना उपायुक्तपदी प्रतिनियुक्तीवर पाठवले आहे. यामध्ये अतुल पाटील, स्वाती देशपांडे व धैर्यशील जाधव या अधिकाऱ्यांचा समावेश आहे. सहाय्यक आयुक्तपदी अक्षय गुडदे, इंद्रायणी करचे व स्नेहा करपे, तर शहर अभियंतापदी सपना कोळी, मुख्य वित्त व लेखा अधिकारीपदी सत्यवान उबाळे, लेखा परीक्षण पदी लक्ष्मण पाटील, परिवहन महाव्यवस्थापकपदी डॉ. दीपक सावंत तर सहायक संचालक नगररचनापदी दीक्षा सावंत व सु.बा .पानसरे यांची सहाय्यक नगर रचनाकारपदी प्रभारी नियुक्ती केली आहे.
पालिकेतील मंजुर असलेल्या पदासाठी सेवा योजना अंतर्गत परीक्षा घेतल्यास त्यातून उत्तीर्ण होणाऱ्या कर्मचाऱ्यांना पालिका अधिकाऱ्याची मंजूर असलेल्या पदावर नियुक्त होता येईल असा सूर पालिका कर्मचारी व अधिकारी वर्गातून आळवला जात आहे.