आधी ठामपाचे खोटे प्रतिज्ञापत्र; आता सुनावणीसाठी पळापळ

पाणी नाही तर नवीन बांधकामेही नकोत – आ. संजय केळकर

ठाणे : पाणी पुरवठ्याबाबत ठाणे महापालिकेने खोटे सत्य प्रतिज्ञापत्र सादर करत नवीन बांधकामांकडे दुर्लक्ष केले, त्यामुळे शहरात सध्या सर्वत्र पाणीटंचाई भेडसावत आहे. आता न्यायालयातील याचिकेवर सुनावणी असल्याने पालिका प्रशासन कातडी वाचवण्यासाठी नागरिकांच्या तक्रारी स्वीकारत आहे, असा आरोप आमदार संजय केळकर यांनी केला आहे. पाणी नाही तर नवीन बांधकामेही नकोत, असा पुनरुच्चार करत त्यांनी नागरिक पाणीपट्टी भरणार नाहीत असा इशाराही दिला.

ठाण्याच्या सर्वच भागांत पाणीटंचाई असून पाण्यासाठी अजून किती मोर्चे काढायचे, असा सवाल आमदार संजय केळकर यांनी केला आहे. जनतेची आणि न्यायालयाची दिशाभूल करू नका, जोपर्यंत पाण्याचे योग्य व्यवस्थापन होत नाही, तोपर्यन्त नवीन बांधकामांना परवानगी देऊ नका, अशी मागणी त्यांनी केली आहे.

ठाणे महापालिकेचे आयुक्त विपीन शर्मा यांच्याशी श्री.केळकर यांनी विविध भागांतील पाणीटंचाई, टँकरमाफिया अनधिकृत बांधकामांना वापरले जाणारे पाणी रखडलेल्या पाणी योजना याबाबत चर्चा केली. दिव्यासारख्या मोठ्या लोकसंख्येच्या भागात अनेक वर्षांपासून पाणी टंचाई भेडसावत असून पाणी योजना रखडल्या आहेत. घोडबंदर भागात अपुरा पाणी पाणी पुरवठा असूनही पुरेपूर पाणीपट्टी भरावी लागत आहे. दिवा, घोडबंदरसह अनेक भागात टँकरद्वारे पाणी मिळवण्यासाठी रहिवाशांना लाखो रुपये महिन्याकाठी खर्च करावे लागत आहेत. महापालिका नागरीकांना पुरेसे पाणी पुरवण्याऐवजी टँकरमाफियांना पोसत असल्याचा आरोप करत या टँकरमाफियांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी आमदार केळकर यांनी केली आहे.

ठाणे महापालिकेने न्यायालयात सत्य प्रतिज्ञापत्र सादर करून पाणी व्यवस्थापनाबाबतचे निर्देश पाळ, असे सांगितले होते, पण प्रत्यक्षात त्याकडे दुर्लक्षच केले. पाणी टंचाई संदर्भात न्यायालयात दाखल केलेल्या जनहित याचिकेची सुनावणी २८ एप्रिलला असल्याने कातडी वाचवण्यासाठी प्रशासन बैठका घेत असून जनतेकडून तक्रारी मागण्याचा फार्स करत आहे. नागरिकांना सत्ताधारी शिवसेना आणि प्रशासनाची ढोंगबाजी लक्षात आली असून पाणी नाही तर नवीन बांधकामांना परवानगी नको आणि पाणी नाही तर पाणी पट्टीही नाही याचा पुनरुच्चार आमदार संजय केळकर यांनी केला आहे.