अंगावर शहारा आणणारं धर्मवीर सिनेमातील ‘गुरुपौर्णिमा’ गाणं आऊट

गुरुविण कोण दाखवील वाट ! गुरुमहिमेचं महात्म्य सांगणारी ही ओळ !

आपल्याकडे गुरूला केवळ ब्रह्म, विष्णू, महेश नाही तर साक्षात परब्रम्ह म्हटलं जाते. महाराष्ट्राला गुरू-शिष्य परंपरेचा मोठा इतिहास लाभला आहे. सामाजिक-राजकिय क्षेत्रातही असे अनेक नेते होऊन गेलेत जे गुरू-शिष्य म्हणून नावाजले आहेत. राजकीय क्षेत्रातील गुरू-शिष्याची आदर्शवत ठरावी अशीच एक जोडी या महाराष्ट्राने बघितली आहे. ही जोडी म्हणजे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) आणि धर्मवीर आनंद दिघे (Anand Dighe) होय. त्यांची बाळासाहेबांवर खूप श्रद्धा होती. त्यांच्या याच गुरुभक्तीचं दर्शन ‘धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे’ या चित्रपटातही होणार आहे. या चित्रपटामधील ‘गुरुपौर्णिमा’ (Gurupournima) हे गाणं आज रिलीज झाले आहे. जे पाहून अनेकांcया डोळ्यात पाणी येणार आहे.

आनंद दिघेच्या मते ‘गुरुपौर्णिमा हा गुरूचा नाही तर शिष्याचा दिवस आहे.’ या दिवशी गुरुची सेवा केली की पुण्य प्राप्ती मिळते अशी त्यांची श्रद्धा होती. आपल्या गुरूंचे चरणकमल धुण्याचा आणि पाद्यपूजा करण्याचा प्रसंग या गाण्यातून उभा करण्यात आला आहे. आनंद दिघे यांची जी श्रद्धा बाळासाहेबांप्रति (Bal Thackeray) होती अगदी तशीच श्रद्धा आनंद दिघे साहेबांबद्दल ठेवणारे शिष्य म्हणजे एकनाथ शिंदे. त्यांच्या या गुरू शिष्य नात्याची अनोखी गोष्ट या चित्रपटातून (Movie) आणि गाण्यातून पाहायला मिळत आहे.

प्रसाद ओक, क्षितिश दाते यांच्याप्रमाणेच बाळासाहेब ठाकरे यांची व्यक्तिरेखा साकारणाऱ्या मकरंद पाध्ये यांच्या लुकवरही रंगभूषाकार विद्याधर बट्टे यांनी घेतलेली मेहनत दिसून येते. झी स्टुडिओज, मंगेश देसाई यांच्या साहिल मोशन आर्ट्सची निर्मिती असलेला, आणि प्रविण तरडे यांच्या लेखन दिग्दर्शनाने सजलेला ‘धर्मवीर मु.पो. ठाणे’ हा चित्रपट 13 मे रोजी प्रदर्शित होणार आहे.