महिला बचत गट घराघरांतून उचलणार १०० टन कचरा

* एकेक गट पोहोचणार 3000 घरापर्यंत
* नाले, रस्ते होणार मोकळे

ठाणे : झोपडपट्टी भागात घंटागाडी पोहचू शकत नसल्याने घरातील कचरा नाल्यात किंवा रस्त्यावर टाकला जातो. आता हा कचरा घराघरात जाऊन संकलित करण्यात येणार आहे. यासाठी बचत गटांची नियुक्ती करण्यात येणार आहे. या बचत गटांच्या माध्यमातून दररोज दोन लाख घरांमधून १०० टन कचऱ्याचे संकलन करण्यात येणार आहे. यातून वर्षाला १,६७७ टन कचरा नाल्यात किंवा रस्त्यावर टाकला जाणार नसल्याने कचऱ्याची समस्या सुटणार आहे.

झोपडपट्टीमधील काही भागात घंटागाडी जात नसल्याने अशा ठिकाणी जाऊन कचरा वेचक कचरा संकलित करण्याचे काम मागील काही वर्षापासून सुरु होते. यासाठी १२९ महिला बचट गटांना काम देण्यात आले होते. एका बचत गटाला पाचशे ते हजार किलो कचरा संकलनाचे काम देण्यात आले होते. त्यासाठी ठाणे महापालिका दर महिन्याला वेतन व इतर सोयीसुविधांसाठी सुमारे २७ लाख रुपये खर्च करत होते. या मोबदल्यात हे कचरावेचक घरोघरी कचरा गोळा करून त्याचे ओला- सुका असे वर्गीकरण करत होते. परंतु कोरोनाचा शिरकाव झाला आणि या कामात असलेल्या महिलांना देखील त्याचा फटका बसला. त्यामुळे हे संपूर्ण काम थांबले होते.

आता ही योजना पुन्हा मार्गी लागली असून हे काम आता बचत गटांच्या माध्यमातून करण्यात येणार आहे. एका बचत गटाला ३००० घरांमधून कचऱ्याचे संकलन करावे लागणार आहे. दररोज १०० टन कचरा गोळा होणार असून वार्षिक १,६७७ टन कचरा गोळा होणार असल्याचे प्रशासनाच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे.

सकाळी ७ पासून कचरा संकलनाला होणार सुरुवात होणार असून एक व्यक्ती ३०० घरांमधून कचरा गोळा करणार एका बचत गटाला ३००० घरांमधून कचरा गोळा करावा लागणार आहे. ओला आणि सुका कचरा वेगळा गोळा होणार असून
कामावर नियंत्रण ठेवण्यासाठी क्यूआर कोड स्कॅन करणे बंधनकारक आहे तर संकलित करण्यात आलेल्या प्रत्येक घराची माहिती अँपद्वारे द्यावी लागणार आहे.

प्रभाग समिती घरांची संख्या

वर्तकनगर १२,३४२
वागळे ३३,७९३
लोकमान्य सावरकर ३४,८३९
कळवा ३९,६०६
मुंब्रा ६५५४५
कोपरी ६,३७८