माजी ज्येष्ठ नगरसेवक संजय वाघुले यांनी वेधले लक्ष
ठाणे : रेल्वे स्टेशन परिसरात १५० मीटर क्षेत्रात फेरीवाल्यांना बंदी करण्याचे आदेश उच्च न्यायालयाने दिले असतानाही, ठाणे रेल्वे स्टेशनसमोरील फेरीवाल्यांची मुजोरी वाढली आहे. खाद्यपदार्थ विक्री करणाऱ्या फेरीवाल्यांकडून बिनदिक्कतपणे पदपथावरच सिलेंडर ठेवून खाद्यपदार्थाची विक्री केली जात आहे. या प्रकाराने प्रवाशांचा जीव धोक्यात असल्याकडे भाजपाचे माजी ज्येष्ठ नगरसेवक संजय वाघुले यांनी लक्ष वेधले आहे.
ठाणे रेल्वे स्टेशन परिसरात सहा लाखांहून अधिक प्रवाशांची वर्दळ आहे. मात्र, महापालिका प्रशासन व रेल्वे प्रशासनाचा दुर्लक्षामुळे रेल्वे परिसरात फेरीवाल्याचा वेढा पडला आहे. रेल्वे स्टेशन बाहेर, सॕटीस पुलाखाली आणि एसटी डेपोबाहेर बिनदिक्कतपणे पदपथ व रस्त्यालगत हातगाड्यांवर खाद्यपदार्थ तयार केले जातात या भागात पाहणी केल्यानंतर किमान १३ सिलिंडर आढळले असून, त्यात घरगुती सिलिंडरचा सर्रास वापर केला जात असल्याचे आढळून आले आहे. विशेष म्हणजे याकडे पोलिस, महापालिका आणि रेल्वे प्रशासन कानाडोळा करीत आहे. परिणामी ठाणे रेल्वे परिसर धोकादायक झाला आहे. ऐन गर्दीच्या वेळी सिलिंडरचा स्फोट झाल्यास त्याची जवाबदारी कोण घेणार, असा सवाल माजी ज्येष्ठ नगरसेवक संजय वाघुले यांनी केला आहे.
रेल्वे परिसरातील सुरक्षा वाऱ्यावर रेल्वे स्टेशन परिसरात फेरीवाल्यांचा वावर वाढला आहे. त्याला पायबंद घालण्यात पोलिस, महापालिका आणि ठाणे पोलिस अयशस्वी ठरले आहेत. काही वषापूवीं स्टेशन परिसरातील स्फोटात एका व्यक्तीचा मृत्यू झाला होता.आता अशाच घटनेची वाट पाहिली जात आहे का? असा सवाल संजय वाघुले यांनी केला आहे.