अतिरिक्त कामाचा ताण प्रशासनाला; बुस्टर माञ वैद्यकीय विभागाला

नव्या आकृतीबंधामुळे वैद्यकीय सेवेला ८७८ पदे
प्रशासनाला मिळणार फक्त दोन उपायुक्त
अतिरिक्त कामाचा ताण कायम 

ठाणे : नव्या आकृतिबंधामुळे ठामपा अधिकाऱ्यांवरील अतिरिक्त कामाचा ताण कमी होण्याची शक्यता व्यक्त होत असतानाच यातील ८८० पैकी ८७८ पदे ही केवळ वैद्यकीय विभागातील असून पालिका प्रशासकीय सेवेत अवघ्या दोन उपायुक्तांचीच भर पडणार असल्याची माहिती समोर आली आहे.

ठाणे शहराची लोकसंख्या २४ लाखांच्या घरात पोहचली  असून या लोकसंख्येला मूलभूत सोयीसुविधा पुरवताना प्रशासनाच्या नाकी नऊ येत आहेत. अपुऱ्या कर्मचारी वर्गामुळे एका-एका अधिकाऱ्यावर दोन त पाच पदांचा अतिरिक्त भार पडत असल्यामुळे त्यांचीही दमछाक होत आहे. त्यामुळे वाढीव पदांची भरती करण्यास मंजुरी मिळावी, असा प्रस्ताव पालिका प्रशासनाने राज्य शासनाला पाठवला होता. त्याला नगरविकास विभागाने मंजुरी देत ८८० पदांची भरती करण्यास हिरवा कंदिल दाखवला
आहे.

शहराच्या मुलभूत गरजा पूर्ण करण्यासाठी या मेगा भरतीमुळे मदत मिळेल असा दावा करण्यात येत असला तरी प्रत्यक्षात मात्र वैद्यकीय व्यवस्थेलाच बळ मिळणार असल्याचे समोर आले आहे. वाढत्या लोकसंख्येच्या तुलनेत ठाणे महापालिकेला सुमारे ६५०० पदे भरण्याची गरज आहे. ही पदे भरण्यास मंजूरी मिळावी यासाठी प्रशासनाने राज्य शासनाकडे पाठपुरावा केला होता. यामध्ये आस्थापनेवरील विविध विभागापासून ते उपायुक्तांपर्यंतच्या पदांची मागणी करण्यात आली होती. पण प्रत्यक्षात केवळ ८८० पदांनाच मंजुरी मिळाल्याने पाच हजाराहून अधिक पदांचा प्रश्न अजूनही प्रलंबित राहिला आहे. त्यातही ८८० पैकी ८७८ पदे ही वैद्यकीय विभागाशी संबंधित आहेत. यामध्ये वॉर्डबॉय, परिचारिका, तंत्रज्ञापासून डॉक्टरांपर्यंतची पदे आहेत. त्यातही डॉक्टरांसाठी १०३ तर परिचारिकांसाठी २९२ पदे मंजूर करण्यात आली आहेत. या पद भरतीमुळे वैद्यकीय सेवा सुधारण्यास मदत मिळेल पण आस्थापनेवरील विविध विभागांना अपुऱ्या मनुष्यबळामुळे कामाचा अतिरिक्त ताण सहन करावा लागणार आहे. पर्यायाने त्याचा परिणाम ठाणेकरांना मुलभूत सेवा पुरवण्यावर पडणार आहे.

अतिरिक्त कामाचा ताण कमी होईना

ठाणे महापालिके त सध्या उपायुक्त पदासाठी १० पदे मंजूर आहेत. नवीन आकृतीबंधात आणखी दोन उपायुक्तांची भर पडून ही संख्या १२ होणार आहे. पालिका प्रशासनातील प्रत्येक अधिकाऱ्याच्या खांद्यावर अतिरिक्त विभागाची जबाबदारी आहे. सहाय्यक आयुक्तांपासून उपायुक्तांपर्यंत सर्वच अधिकाऱ्यांना पाच ते १४ विविध विभागांची जबाबदारी पार पाडावी लागत असल्याने त्याचा परिणाम सेवेवर होत आहे.