विजयाचा दुष्काळ संपला ! चेन्नईची बंगळुरुवर २३ धावांनी मात

आयपीएलच्या पंधराव्या हंगामामधील चेन्नई संघासाठी विजयाचा दुष्काळ अखेर मिटला आहे. बंगळुरुविरोधातील सामन्यात चेन्नईने दणदणीत विजय मिळवला आहे. या हंगामातील चेन्नईचा हा पहिलाच विजय असून बंगळुरुवर २३ धावांनी मात केली आहे. चेन्नईने बंगळुरुसमोर २१७ धावांचे लक्ष्य उभे केले होते. मात्र बंगळुरुचा पूर्ण संघ अवघ्या १९३ धाव करु शकला. चेन्नईच्या विजयासाठी फलंदाजीमध्ये शिवम दुबे आणि रॉबिन उथप्पा या जोडीने तर गोलंदाजी विभागामध्ये माहीश तिक्षाना आणि रविंद्र जाडेजाने जबरदस्त कामगिरी केली.

चेन्नईने दिलेल्या २१७ धावांचे लक्ष्य गाठण्यासाठी आलेल्या बंगळुरुचे सर्व गडी ठराविक अंतराने बाद होत गेले. फाफ डू प्लेसिस आणि अनुज रावत या जोडीने निराशा केली. फाफने आठ तर अनुज रावतने १२ धावा केल्या. बंगळुरुचा हुकुमी एक्का समजला जाणारा विराट कोहली फक्त एक धाव करुन मुकेश चौधरीच्या चेंडूवर झेलबाद झाला. तिसऱ्या विकेटसाठी आलेला ग्लेन मॅक्सवेलदेखील २६ धावांवर रविंद्र जाडेजाने टाकलेल्या चेंडूवर त्रिफळाचित झाला. पहिल्या फळीतील चार फलंदाज बाद झाल्यानंतर बंगळुरुची ५० धावांमध्ये चार गडी बाद अशी दयनीय परिस्थिती झाली होती.

शाहबाज अहमद आणि सुयश प्रभुदेसाई या जोडीने मात्र बंगळुरुला काही प्रमाणात सावरण्याचा प्रयत्न केला. मैदानावर स्थिरावत या जोडीने धावा चोरण्याचा प्रयत्न केला. मात्र माहीश तिक्षानाने या दोघांनाही त्रिफळाचित केलं. अहमदने ४१ धावा केल्या. तर प्रभुदेसाईने ३४ धावा केल्या. सहाव्या विकेटसाठी आलेल्या दिनेश कार्तिकने पुन्हा एकदा शानदार खेळी करत चेन्नईला काही काळासाठी चिंतेत टाकलं. त्याने १४ चेंडूंमध्ये ५ चौकार आणि १ षटकार लगावत ३४ धावा केल्या. कार्तिक धाबवाद झाल्यानंतर मात्र बंगळुरुच्या विजयाच्या आशा मावळल्या. वनिंदू हसरंगाने सात धावा केल्या. तर आकाश दीपला खातंही उघडता आलं नाही.

यापूर्वी अगोदर फलंदाजीसाठी उतरलेल्या चेन्नईने सुरुवातपीसूनच आक्रमक खेळ केला. ऋतुराज गायकवाड १७ धावांवर बाद झाल्यानंतर चेन्नईचा संघ पुन्हा एखदा कोसळतो की काय असे वाटत असताना सलामीला आलेल्या रॉबिन उथप्पाने बहारदार खेळी केली. त्याने नऊ षटकार आणि चार चौकार लगावत ५० चेंडूंमध्ये ८८ धावा केल्या. त्याच्या या खेळीमुळे चेन्नईला मोठी धावसंख्या गाठत आली. मोईन अली मात्र चांगली खेळी करु शकला नाही. तो अवघ्या तीन धावांवर धावचित झाला. तिसऱ्या विकेटसाठी आलेल्या शिवम दुबेनेदेखील मोठे फटके लगावत बंगळुरुच्या गोलंदाजांना घाम फोडला. त्याने ४६ चेंडूंमध्ये आठ षटकार आणि पाच चौकार यांच्या मदतीने नाबाद ९५ धावा केल्या. वीस षटके संपल्यामुळे पाच धावांनी दुबेचे शतक हुकले. रविंद्र जाडेजा शून्यावर बाद झाला.