राज ठाकरेंच्या स्वागतासाठी मनसेची जय्यत तयारी; २०० चारचाकी आणि १००० दुचाकीस्वारांच्या रॅलीत होणार आगमन

राज ठाकरेंच्या स्वागतासाठी मनसेची जय्यत तयारी मंगळवारी 12 तारखेला २०० चारचाकी आणि १००० दुचाकीस्वारांच्या रॅलीत राज ठाकरे यांचे ठाण्यात होणार आगमन

अनंत अडथळे आल्यानंतरही मंगळवारी ठाण्यात होत असलेल्या मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या उत्तर सभेची उत्सुकता वाढली आहे.राज ठाकरे या सभेत कुणाकुणाची उत्तरक्रिया करतात याकडे जनतेचे लक्ष लागले असुन ठाण्याची मनसेही सभेच्या जय्यत तयारीला लागली आहे.उत्तर सभेसाठी ठाण्यात येत असलेल्या राज ठाकरे यांचे स्वागत भगवे झेंडे घेतलेल्या तब्बल २०० चारचाकी आणि १००० दुचाकीस्वारांची रॅली ठाण्याच्या वेशीवरून थेट सभास्थानापर्यत करणार आहेत.त्यामुळे, अवघे ठाणे मनसेमय बनले आहे.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गुढी पाडव्याला केलेल्या हिंदुत्वाच्या हुंकाराचे पडसाद अद्यापही उमटत आहेत.राज ठाकरे यांच्या वक्तव्यावर टीका करणाऱ्या विरोधकांचा समाचार घेण्यासाठी राज ठाकरे यांची ‘उत्तरसभा’ ठाण्याच्या गडकरी रंगायतनसमोरील डॉ.मूस रोड वर होत आहे.ही सभा दणक्यात होणार असल्याने सत्ताधाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत. या सभेच्या आयोजनासाठी मनसे ठाणे-पालघर जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली हजारो महाराष्ट्र सैनिक कामाला लागले आहेत. राज ठाकरे यांच्या स्वागतासाठी ठाण्याच्या वेशीवरून तब्बल २०० चारचाकी आणि १००० दुचाकीची रॅली काढण्यात येणार आहे. एकप्रकारे मनसेच्या झेंड्याखाली पुन्हा एकदा तरुणाई एकवटत असल्याचे चित्र दिसत असुन मनसेवर उठसुठ तोंडसुख घेणाऱ्या आघाडीतील नेत्यांची उत्तरक्रिया राज ठाकरे कशी करतात. हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

१२ एप्रिलला कुणाचे ‘बारा’ वाजवणार ?

प्रदीर्घ कालावधीनंतर ठाण्यात जाहिर सभा होत आहे.१२ एप्रिल रोजी होणाऱ्या उत्तर सभेत मनसेप्रमुख कुणाचे ‘बारा’ वाजवणार याची उत्सुकता ताणली गेली आहे. राज ठाकरे यांच्या ठाण्यातील सभेमुळे पोलिसांसमोरही मोठे आव्हान उभे ठाकले आहे.