मोठ्या थकबाकीदारांचे पाणी तोडणार

अतिरिक्त आयुक्तांचे निर्देश

ठाणे : सन २०२२-२३ या आर्थिक वर्षातील पाणी पट्टी कराच्या बिलांची वेळेत वितरण करून १०० टक्के वसुली करण्याचे आदेश देतानाच मोठ्या थकबाकीदारांवर धडक कारवाई करण्याचे कडक आदेश आज महापालिका अतिरिक्त आयुक्त संजय हेरवाडे यांनी संबंधितांना दिले.

आज कै.नरेंद्र बल्लाळ सभागृहात महापालिका अतिरिक्त आयुक्त संजय हेरवाडे यांनी सन २०२१-२२ हे आर्थिक वर्षातील पाणी कर वसुली तसेच सन २०२२-२३ आर्थिक वर्षातील पाणी कराच्या वसुलीच्या नियोजनाचा आढावा घेतला.

प्रत्येक प्रभाग समितीनिहाय ५ मेपर्यंत नॉन मीटरची बिलांचे वितरण करणे, मीटरचे रीडिंग घेणे, डिमांड तयार करणे, चोरून बेकादेशीर नळ कनेक्शन शोधुन त्यांच्यावर कडक करावी करणे, वापर बदलांची नोंद घेवून देयके तयार करणे यासोबतच पाणी पट्टी वसुलीचे काम प्राधान्याने करण्याविषयी महापालिका अतिरिक्त आयुक्त संजय हेरवाडे यांनी स्पष्ट शब्दात सांगितले.

यावेळी अतिरिक्त आयुक्त संजय हेरवाडे यांनी पाणी कराची वसुली वाढविण्यासाठी सर्व सहाय्यक आयुक्त, कार्यकारी अभियंता, उप अभियंता, कर वसुली लिपीक यांनी आपल्या स्तरावर कठोर पावले उचलावीत असे सांगितले. त्याचप्रमाणे पाणी वसुलीबाबत विभागाने पाणी बिलांची छपाई करून वेळेत वितरण करून वसुली करावी अशा सक्त सूचना सर्व अधिका-यांना दिल्या.

शहरातील ज्या सोसायट्यामध्ये वैयक्तिक पाणीपट्टी कराची थकबाकी आहे, त्या सदनिकाधारकांची नावे जाहीर करून त्यांच्यावरही यापुढे कडक कारवाई करण्याचे निर्देशही श्री. हेरवाडे यांनी संबंधितांना दिले. दरम्यान दैनंदिन वसुली व थकबाकीदारांवर केलेल्या कारवाईचा अहवाल आठवड्याला सादर करण्याचे निर्देशही त्यांनी यावेळी दिले.