ठाणे: ठाणे महापालिकेत शिवसेनेची सत्ता संपुष्टात येऊन, महिनाभराचा कालावधी झाल्यानंतर पालकमंत्री व नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून कोपरी-वागळे इस्टेटमध्ये काढलेले दौरे हे शिवसेनेचे महापालिकेतील पाच वर्षांतील कामाचे अपयशच आहे, असा टोला भाजपाचे आमदार व जिल्हाध्यक्ष निरंजन डावखरे यांनी लगावला आहे.
कोपरी-वागळे इस्टेट परिसरात अपुर्ण नागरी प्रकल्पांची पाहणी करण्यासाठी पालकमंत्र्यांना दौरा काढावा लागला. पालकमंत्र्यांचा दौऱ्याचा निर्णय म्हणजे शिवसेनेच्या अपयशावरच शिक्कामोर्तब होत आहे, अशी टीका आमदार डावखरे यांनी केली.
ठाणे शहरातून जाणाऱ्या मेट्रो प्रकल्पाच्या पाहणीसाठी पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी दौरा केला होता. त्यापाठोपाठ वागळे इस्टेट येथील रस्त्यांची कामे आणि कोपरीतील विकासकामांची पाहणी करण्यासाठी दौरा केला. या दौऱ्यामध्ये अनेक ठिकाणी नागरी सुविधांचा अभाव आढळला, याकडे आमदार डावखरे यांनी लक्ष वेधले.
महापालिकेत शिवसेनेची पाच वर्ष सत्ता होती. ठाणे शहराचा विकास केला असल्याचा दावा शिवसेनेकडून केला जातो. मात्र, प्रत्यक्षात ठाणेकरांना अनेक प्रश्न भेडसावत आहेत. तीव्र पाणीटंचाई, वाहतूककोंडी, फेरीवाले, अतिक्रमणांचा विळखा अशा परिस्थितीत ठाणेकर राहत आहेत. आता महापालिका निवडणुकीचे वेध लागल्यानंतर, पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून दौरे काढले गेले. त्यातून मेट्रोची कामे सुरू असलेल्या ठिकाणांबरोबरच खुद्द पालकमंत्र्यांच्याच कोपरी-पाचपाखाडी विधानसभा मतदारसंघातील विदारक स्थिती समोर आली. संपूर्ण ठाणे महापालिका क्षेत्राचा आढावा घेतल्यास आणखी भीषण परिस्थिती समोर येईल. अशा परिस्थितीत पाच वर्षांत महापालिकेतील सत्ताधाऱ्यांनी कोणती कामे केली? असा सवाल आमदार डावखरे यांनी केला. त्याचबरोबर स्मार्ट सिटी प्रकल्पात कोट्यवधी रुपयांचा खर्च झाल्यानंतरही नागरिकांना काहीही फायदा झालेला नाही, याकडेही श्री. डावखरे यांनी लक्ष वेधले.