ठाणे : ठाणे महापालिकेतील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या अंतर्गत बदल्या करण्यात आल्या असून पदोन्नती मिळालेले गजानन गोदापुरे यांच्याकडे अतिक्रमण उपायुक्तपद तर महापालिकेच्या सचिव पदाची जबाबदारी मनिष जोशी यांच्याकडे देण्यात आली आहे.
महापालिका आयुक्त डॉ. विपीन शर्मा यांनी आज दहा वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या. अतिक्रमण उपायुक्त अशोक बुरपुल्ले यांच्या रिक्त झालेल्या जागेवर श्री. गोदापुरे यांना बढती देण्यात आली आहे. त्यांच्याकडे करनिर्धारक आणि संकलक, सुरक्षा आपत्ती व्यवस्थापन, आणि परिमंडळ ३ चा कार्यभार देण्यात आला आहे. मनीष जोशी यांना घनकचरा व्यवस्थापन, सचिव, आरोग्य विभाग, एलबीटी, स्थावर मालमत्ता आणि परिमंडळ १ ची जबाबदारी देण्यात आली आहे. मारुती खोडके यांच्याकडे
मुख्यालय, मागासवर्गीय कक्ष, कार्मिक विभाग, अग्निशमन विभाग, नागरी सुविधा कक्ष, उद्यान वृक्षप्राधिकारण, जाहिरात विभाग जनसंपर्क कक्ष राजेश कवळे यांच्याकडे जकात, ज्ञानेश्वर ढेरे यांना माहिती व तंत्रज्ञान, परवाना आणि कार्यशाळेचा पदभार सोपवण्यात आला आहे. वर्षा दीक्षित यांच्याकडे समाजविकास आणि महिला व बालकल्याण विभागाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.
अनघा कदम यांची शिक्षण विभाग, भांडारपाल, प्रदषणू नियंत्रण विभागाच्या उपायुक्तपदी बढती देण्यात आली आहे. मिनल पालांडे यांना क्रीडा विभागाच्या उपायुक्त पदाचा प्रभारी कार्यभार सोपविण्यात आला आहे. सहायक आयुक्त शंकर पाटोळे यांना परिमंडळ २चा अतिरिक्त कार्यभार सोपविण्यात आला आहे तर सहायक आयुक्त महेश आहेर यांच्याकडे अतिक्रमण विभागाच्या सहायक आयुक्त पदाचा अतिरिक्त कार्यभार सोपवण्यात आला आहे. उथळसर प्रभाग समितीचे सहायक आयुक्तपद
आणि स्थावर मालमत्ता विभागाचा पदभार त्यांच्याकडे कायम ठेवण्यात आला आहे. महापालिका आयुक्त डॉ. शर्मा यांनी पहिल्यांदाच इतक्या मोठ्या प्रमाणावर बदल्या केल्या आहेत.
महेश आहेर यांच्या कामगिरीची पोचपावती
महेश आहेर यांनी सहायक आयुक्त पदावर ज्या-ज्या प्रभागात जबाबदारी सांभाळली, त्या- त्या प्रभागात सर्वाधिक अतिक्रमणविरोधी कारवायांची नोंद झाली. मुंब्रा, दिवा या प्रभागांमध्ये त्यांनी केलेल्या कारवाईचा अतिक्रमण धारकांनी चांगलाच धसका घेतला होता. उथळसर प्रभागातही त्यांच्या कणखर नेतृत्वाचा प्रभाव दिसून येतो. त्यांच्या कामगिरीची पोचपावतीच त्यांना अतिक्रमण विभागाच्या सहायक आयुक्त पदाच्या माध्यमातून मिळाल्याचे बोलले जात आहे. विशेष म्हणजे त्यांच्या शैक्षणिक अर्हतेबाबत प्रश्नचिन्ह उभे करण्यात आले होते. प्रशासनाने ही अर्हता सत्य असल्याचा निर्वाळा देत बढतीच्या माध्यमातून या वादावरही अखेर पडदा टाकला आहे.