आमदार निरंजन डावखरे यांच्या पाठपुराव्याला यश
ठाणे : मुंब्रा रेल्वेस्थानकात ऑगस्टअखेर दोन लिफ्ट आणि डिसेंबरअखेर तीन ठिकाणी सरकते जिने (एस्कलेटर) सुरू करण्यात येणार आहेत. भाजपाचे आमदार व जिल्हाध्यक्ष निरंजन डावखरे यांच्या पाठपुराव्यानंतर मध्य रेल्वेने डिसेंबरपर्यंत लिफ्ट व सरकत्या जिन्यांची रखडलेली कामे पूर्ण करण्याचा निर्णय घेतला आहे.
मुंब्रा रेल्वेस्थानकातून दररोज हजारो प्रवाशांकडून प्रवास केला जातो. या स्थानकात तीन ठिकाणी सरकते जिने व दोन ठिकाणी लिफ्ट बसविण्याच्या कामाला मंजुरी देण्यात आली होती. त्याबाबतचे साहित्य मुंब्रा रेल्वे स्थानकात आणले गेले. मात्र, ते बसविण्याचे काम सुरूच करण्यात आले नाही. त्यामुळे दररोज महिला, मुले आणि ज्येष्ठ नागरिकांचे हाल होत होते. या प्रकाराकडे आमदार निरंजन डावखरे यांनी रेल् राज्यमंत्री रावसाहबे दानवे यांना निवेदन देऊन लक्ष वेधले होते. तसेच मध्य रेल्वेच्या अधिकाऱ्यांकडे पाठपुरावा सुरू केला होता.
अखेर मुंब्रा रेल्वेस्थानकात ऑगस्टपर्यंत दोन लिफ्ट व डिसबेंरअखेरपर्यंत तीन ठिकाणी सरकत्या जिन्यांची कामे पूर्ण करण्याचा निर्णय मध्य रेल्वेने घेतला आहे. याबाबत मध्य रेल्वेचे विभागीय व्यवस्थापकांनी श्री. डावखरे यांना पत्राद्वारे ही माहिती कळविली. मध्य रेल्वे प्रशासनाने लिफ्ट व सरकते जिने बसविण्याचे काम मंजूर केले होते. मात्र, संबंधित कंत्राटदाराकडून काम सुरू करण्यात आले नव्हते. आता रेल्वे राज्यमंत्री रावसाहबे दानवे यांच्या आदेशानुसार सरकते जिने व लिफ्टची कामे पूर्ण होतील. त्याचा हजारो प्रवाशांना दिलासा मिळेल, अशी प्रतिक्रिया आमदार निरंजन डावखरे यांनी व्यक्त केली.