नवी मुंबईत उभारणार तिरुपतीचे भव्य मंदिर!

नवी मुंबई : तिरुपती बालाजीच्या भक्तगणांसाठी आनंदाची बातमी आहे. ज्या भक्तांना आंध्र प्रदेश इथे जाऊन बालाजीचे दर्शन घेता येत नाही त्यांच्यासाठी नवी मुंबईत भव्य दिव्य असं तिरुपती बालाजी मंदिर उभारण्यात येणार आहे.

नवी मुंबईतील आंतरराष्ट्रीय विमानतळापासून हाकेच्या आंतरावर उलवे इथे दहा एकर जागेवर हे मंदिर साकारण्यात येणार आहे.
तिरुपती देवस्थानकडून महाराष्ट्र सरकारकडे मंदिर बांधण्यासाठी जागा मिळावी, अशी मागणी करण्यात आली होती. यावर सकारात्मक भूमिका घेत सिडकोच्या संचालक मंडळाच्या बैठकीत हा प्रस्ताव मंजूर करुन तो अंतिम मंजुरीसाठी राज्य सरकारकडे पाठवा, असे निर्देश नगरविकास खात्याचे मंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांनी अधिकाऱ्यांना दिले होते.
मराठी नववर्ष आणि गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर (2 एप्रिल) सिडको संचालक मंडळाच्या बैठकीत तिरुमला तिरुपती देवस्थानमला या मंदिरासाठी जमीन देण्याच्या निर्णयावर शिक्कामोर्तब करण्यात आलं. तिरुपती देवस्थानचे अध्यक्ष सुब्बा रेड्डी आणि मंत्री अदित्य ठाकरे हे या बैठकीत उपस्थित होते.
27 फेब्रुवारी 2022 रोजी तिरुपती तिरुमला देवस्थानमचे अध्यक्ष सुब्बा रेड्डी यांनी जमीन वाटपासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिलं होते. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी मंदिरासाठी सिडकोला नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाजवळ योग्य जागा शोधण्याचे निर्देश दिले होते. जमिनीच्या वाटपाला तत्वतः मान्यता दिल्यानंतर सुब्बा रेड्डी यांच्यासह अतिरिक्त मुख्य अधिकारी धर्मा रेड्डी, विश्वस्त मिलिंद नार्वेकर आणि सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक संजय मुखर्जी यांनी भेट देऊन जागेची पाहणी केली होती.

ही जमीन सिडकोने मुंबई ट्रान्स हार्बर लिंकच्या कास्टिंग यार्डसाठी एमएमआरडीएला भाडेतत्त्वावर दिलेल्या जमिनीचा भाग होती. मात्र एमएमआरडीएने ही जमीन मार्च ते सप्टेंबर 2023 पर्यंत टप्प्याटप्प्याने परत देण्याचं मान्य केलं आहे.
कोल्हापुरातील महालक्ष्मी मंदिरात तात्काळ दर्शन घेतल्यावरच तिरुपती बालाजीचे दर्शन पूर्ण होते, अशी धारणा आहे. त्यामुळे ही जागा मंदिरासाठी देणे हे अनेक अर्थाने महत्त्वपूर्ण आहे. शिवाय कोल्हापुरात जाणाऱ्या भाविकांसाठी नवी मुंबईतील बालाजी मंदिर वरदान ठरणार आहे.