* चार ते पाच प्रवासी जखमी
* १० गाड्या रद्द
नाशिक : मुंबईहून निघालेली पवन एक्स्प्रेस रविवारी (३ एप्रिल) दुपारी सव्वातीन वाजेच्या सुमारास देवळाली-लहवीत दरम्यान घसरली. या अपघातात एका प्रवाशाचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती आहे. या गाडीचे ११ डबे घसरले. या अपघातामुळे मुंबईहून नाशिककडे येणाऱ्या मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली असून लांब पल्ल्याच्या आठ ते १० गाड्या विविध स्थानकांवर थांबविण्यात आल्या आहेत.
मुंबई-जयनगर (बिहार) पवन एक्स्प्रेस इगतपुरीकडून नाशिककडे येत असताना हा अपघात झाला. लहवीतजवळ रेल्वेमार्ग उखडून एकामागोमाग एक डबे घसरले. त्यांची चाके जमिनीत रुतली. यानंतर प्रवाशांमध्ये एकच गोंधळ उडाला. लगतची दुसरी मार्गिका (नाशिक-मुंबई) सुमारे ५०० मीटर अंतरावर असल्याने अपघाताने ती बाधित झाली नाही. अपघाताची माहिती समजताच रेल्वे, जिल्हा प्रशासनातील अधिकाऱ्यांसह अग्निशमन दलाच्या पथकांनी घटनास्थळी धाव घेतली.
अपघातात एका प्रवाशाचा मृत्यू
जखमी प्रवाशांना रुग्णवाहिकेद्वारे जिल्हा रुग्णालयात रवाना करण्यात आले. अपघातग्रस्त गाडीतील अन्य प्रवाशांच्या वाहतुकीसाठी राज्य परिवहन आणि मनपा शहर बससेवेच्या गाड्या तातडीने घटनास्थळी पाठविण्यात आल्या. अपघातात एका प्रवाशाचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती असल्याचे निवासी उपजिल्हाधिकारी भागवत डोईफोडे यांनी सांगितले. काही प्रवासी जखमी आहेत.
रेल्वे मार्गाच्या दुरुस्तीसाठी किमान १० तास लागण्याची शक्यता
अपघातात रेल्वे मार्गाचे प्रचंड नुकसान झाले आहे. इगतपुरी आणि भुसावळ स्थानकाहून रेल्वेचे आपत्कालीन सहाय्यता पथक महाकाली क्रेनसह अपघातस्थळी दाखल होत आहे. अपघातग्रस्त रेल्वे रुळावर घेणे आणि रेल्वे मार्गाच्या दुरुस्तीसाठी किमान आठ ते १० तास लागण्याची शक्यता आहे. अपघाताने मध्य रेल्वेच्या मुंबई-भुसावळ मार्गावरील वाहतूक पूर्णत ठप्प झाली आहे.
मुंबईहून निघालेल्या आठ ते १० गाड्या वेगवेगळ्या स्थानकांवर थांबविण्यात आल्याचे अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले. नाशिकहून मुंबईकडे जाणारी मार्गिका सुरू असल्याने अडकलेल्या रेल्वे गाड्या काही तासांनी त्यावरून टप्प्याटप्प्याने रवाना केल्या जातील. पण, मुंबई-नाशिक मार्गिकेने जाणाऱ्या, पण मुंबईहून न सुटलेल्या गाड्या रद्द केल्या जातील, असेही रेल्वे प्रशासनाकडून सांगण्यात आले.