गावठाणातील मिळकतींना अधिकार अभिलेख

पळसोळी व बेहरे ग्रामस्थांना मिळकत पत्रिका

ठाणे : केंद्र शासनाच्या स्वामित्व योजनेअंतर्गत ड्रोनद्वारे केलेल्या गावठाणांचा सर्व्हे पूर्ण झालेल्या कल्याण तालुक्यातील पळसोळी व बेहरे गावातील ग्रामस्थांना सनदा व मिळकत पत्रिकांचे वाटप जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांच्या हस्ते आज झाले. स्वामित्व योजनेमुळे गावठाणातील मिळकतींना अधिकार अभिलेख प्राप्त होणार असल्याचे श्री. नार्वेकर यांनी यावेळी सांगितले.

यावेळी कोकण विभागाचे भूमी अभिलेख उपसंचालक गीता देशपांडे, भूमी अभिलेख विभागाचे जिल्हा अधिक्षक बाबासाहेब रेडेकर यांच्यासह उपअधिक्षक व नगर भू मापन अधिकारी, दोन्ही गावातील नागरिक यावेळी उपस्थित होते.

महाराष्ट्र राज्याच्या गावठाण जमाबंदी योजनेच्या आधारावर गावामधील रहिवासासाठी मिळकतीचे स्वामित्व अधिकार देण्यासाठी केंद्र शासनाने संपूर्ण देशात स्वामित्व योजना सुरू केली. राज्यातील सर्व गावांच्या गावठाणातील जमिनीचे जीआयएस आधारित सर्वेक्षण व भूमापन करण्यात येत आहे. याअंतर्गत ठाणे जिल्ह्यात सर्व तालुक्यांमध्ये गावठाण भूमापन न झालेल्या सर्व गावांचे गावठाण भूमापन करुन मिळकत पत्रिका स्वरूपात अधिकार अभिलेख व गावातील मालमत्तांचे जीआयएस प्रणालीवर आधारित मालमत्ता पत्रक तयार करण्यात येत आहे.

जिल्ह्यातील कल्याण, मुरबाड, अंबरनाथ व शहापूर तालुक्यात ड्रोन फ्लाईंगव्दारे सर्व्हेक्षण पूर्ण झाले आहे. त्यातील कल्याण तालुक्यातील बेहरे व पळसोली ग्रामस्थांना आज त्यांच्या मालमत्तेच्या सनदा व मिळकत पत्रिकांचे वाटप करण्यात आले.

जिल्हाधिकारी श्री. नार्वेकर म्हणाले की, गावठाणातील नियोजन व हद्दीच्या वादांचे निराकरण यासाठी ड्रोन सर्वेक्षण महत्वाचे ठरणार आहे. ग्रामपंचायतीचे आर्थिक स्वायत्तता व ग्रामस्थांची आर्थिक पत वृध्दिंगत होणार आहे. ग्रामस्थांना या मिळकत पत्रिकेमुळे बँकेकडून तारण कर्ज सहज उपलब्ध होईल. विशेषतः ज्या ग्रामस्थांकडे शेती नाही. त्यांना सुध्दा स्थावर मिळकतीची मिळकत पत्रिका मिळाल्यामुळे त्यांच्यासाठी ही योजना अधिक लाभदायी ठरणार आहे.

ठाणे जिल्ह्यातील भिवंडी, ठाणे या तालुक्यांतील गावांचे सर्वेक्षण सुरू असून उर्वरित तालुक्यांचे ड्रोनद्वारे सर्वेक्षण करण्यात आले आहे. यासाठी सर्वे ऑफ इंडियाकडून ड्रोन देण्यात आले आहे. कल्याणचे भूमीअभिलेख उपअधिक्षक संग्राम जोगदंड यांनी प्रास्ताविक केले.