कल्याण पूर्वेत आठ महिन्यापासून तीव्र पाणीटंचाई
कल्याण : कल्याण पूर्वेतील खडेगोळवली परिसरात निर्माण होत असणाऱ्या पाणीटंचाईमुळे महिला वर्ग त्रस्त झाला असून पाणी सोडत असलेल्या टाकीवर मोर्चा काढून आपला संताप व्यक्त केला आहे. येत्या पंधरा दिवसात पाणीटंचाई दूर करण्यास पालिका प्रशासन कुचकामी ठरल्यास हंडा मोर्चा आयोजित केला जाईल असा इशारा माजी उपमहापौर विकी तरे यांनी दिला आहे.
खडेगोळवली सखल भागात येत असून तरीसुद्धा या भागात गेल्या आठ महिन्यापासून महिलांना पाण्यासाठी वणवण भटकंती करावी लागत आहे. या विभागाला कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेचे पाणी पुरवठा विभाग दररोज दोन तास पाणीपुरवठा वितरण करीत असून पाण्याचा अनियमित पुरवठा तर कधी नळांना पाणी येत नसल्याने पाण्यासाठी सर्वसामान्यांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे. पाणीपुरवठा सुरळीत नसल्याने महिलावर्ग मेटाकुटीला आला आहे. पाणी मोटर लावूनही नळांना पाणी येत नसून पाण्यासाठी चार पाच तास दररोज घालवावे लागत असल्याचे येथील महिलांनी सांगितले आहे. पिण्याचे पाणी पिण्यास मिळत नसल्याने कधी पाण्याचे टँकर ते कधी पाण्याचा बाटला विकत आणावा लागत असून हा नित्याचाच प्रकार घडत असल्याची माहिती संतप्त महिलांनी दिली आहे.
याच परिसरात काही भागात मुबलक पाणीपुरवठा रहिवाश्यांना मिळत असून त्यांच्याकडे हंडाभर पाणी मागितल्यास ते देत नसून नाईलाजास्तव विहीरीमधून पाणी आणावे लागत असल्याची माहिती वनिता या युवतीने दिले आहे. महापालिकेच्या अधिकाऱ्याकडे पाणीपुरवठा संदर्भात तक्रार करूनही त्याकडे दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप केला गेला आहे हरी ओम साई कृपा साई कंट्रक्शन सुरेश केंने नगर, साईबाबा कॉलनी, हरी पाटील कॉलनी आदी भागात पाणी टंचाई निर्माण झाली आहे.
माजी उपमहापौर विकी तरे यांनी याबाबत सांगितले की पाणीप्रश्न हा आजचा नसून गेल्या आठ महिन्यापासून तीव्र पाणी टंचाई सुरू आहे यासंदर्भात पाणी पुरवठा अधिकाऱ्यांकडे याबाबत अनेकदा निवेदने देऊन पाणीटंचाई दूर करण्याची मागणी सातत्याने आपण करीत आहोत मात्र केवळ आश्वासन देऊन ठोस पाऊल उचलले जात नसल्याने येत्या पंधरा दिवसात पाणीटंचाई दूर न झाल्यास पालिकेवर हंडा मोर्चा धडकणार असल्याचा इशारा तरे यांनी दिला आहे.
तर मंगळवारी लोड शेडींग पाणीपुरवठा बंद असल्याने कमी दाबाने पाणी पुरवठा होत होता खडेगोळवली तीन सुरुवातीच्या भागातील राहत असणाऱ्या रहिवाशांनी पाणी प्रेशर येण्यासाठी मोटर पंप लावले असून त्या मोटर पंप मुळे मागील भागात राहत असणाऱ्या नागरिकांना पाणी मिळत नसल्याने मोटार पंप असणार्यांवर कारवाई करीत पंप जप्त करण्याची कारवाई करणार असल्याची माहिती पाणी पुरवठा विभागाचे उपअभियंता चंद्रकांत सोनवणे यांनी दिली आहे.