नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांचा पाहणी दौरा
ठाणे : वडाळा ते कासारवडवली या ‘मेट्रो मार्ग ४ च्या प्रकल्पाच्या कामाची मुदत २०२३ पर्यंत असून हा प्रकल्प वेळेत पूर्ण करणार असल्याची माहिती नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी गुरुवारी दिली.
नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांनी गुरूवारी वडाळा-कासारवडवली या मेट्रो प्रकल्पाची पाहणी केली. मॉडेला चेकनाका येथून शिंदे यांनी दौऱ्याला सुरुवात केली. या भागात मेट्रोचे काम किती टक्के पुर्ण झाले आहे, याचा आढावा घेत उर्वरित कामे ठरलेल्या वेळेत पूर्ण करण्याचे आदेश त्यांनी अधिकाऱ्यांना दिले.
या मेट्रो प्रकल्पाचे काम पूर्ण करण्यासाठी डिसेंबर 2023 पर्यंतची मुदत आहे. या मुदतीत काम पूर्ण करण्याचा आमचा प्रयत्न आहे, असे शिंदे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. जिल्ह्यात मेट्रोचे जाळे तयार करण्याचे काम सुरू असून यामुळे ठाणे, भिवंडी, कल्याण,अंबरनाथ आणि बदलापूर ही शहरे मेट्रोच्या माध्यमातून एकमेकांना जोडली जाणार आहेत,या असेही त्यांनी सांगितले.
ईडीच्या कारवाया सरकार अस्थिर करण्यासाठी
महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाल्यापासूनच ईडीच्या कारवाया सुरु असून सरकार अस्थिर करण्यासाठीचा हा प्रयत्न आहे. हे सरकार पूर्ण बहुमताचं सरकार असल्याचा विश्वास राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला आहे. निधी वाटपाबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे प्रश्न मिटला असून आता याबाबत कोणत्याही प्रकारची नाराजी नसल्याचे शिंदे यांनी सांगितले. तर नाना पटोले यांच्या वकिलांवर झालेल्या कारवाईबाबत मात्र त्यांनी आपल्याला याबाबत काहीही माहित नसून माहिती घेतल्यानंतर बोलेन असे त्यांनी सांगितले.