ठाण्यात कोरोनाची पाटी पुन्हा कोरी

ठाणे : शहरातून पुन्हा एकदा कोरोना हद्दपार झाला आहे. आज एकाही नवीन रुग्णाची नोंद ठाण्यात झाली नाही तर जिल्ह्यात पाच रूग्ण वाढले आहेत.

ठाणे महापालिका हद्दीतून आज कोरोना हद्दपार झाला आहे. मागील आठवड्यात देखील शून्य रुग्णाची नोंद झाली होती. नवी मुंबई महापालिकेत तीन, कल्याण-डोंबिवली महापालिका आणि अंबरनाथ नगरपालिका येथे प्रत्येकी एक रुग्णाची भर पडली आहे. उर्वरित महापालिका आणि नगरपालिका भागात रूग्ण शून्य सापडले आहेत.

जिल्ह्यातील रुग्णालयात आणि घरी १६८ जणांवर उपचार सुरू आहेत. एकही रूग्ण दगावला नसून आत्तापर्यंत ११,८८०जणांचा मृत्यू झाला आहे. आत्तापर्यंत सहा लाख ९६,७१३ रूग्ण ठणठणीत बरे होऊन घरी गेले आहेत तर आत्तापर्यंत सात लाख ८,७६९जण बाधित सापडले आहेत.