पोलीस कुटुंबे धोकादायक घरांत भीतीच्या सावटाखाली

* घरे तत्काळ खाली करण्याच्या नोटीसा
* माजी महापौरांची मध्यस्थी

ठाणे : ठाण्यातील जरीमरी पोलीस लाईनमधील इमारती राहण्यासाठी धोकादायक झाल्याने सर्व रहिवाशांनी आपली घरं तत्काळ खाली करावीत, अशी नोटीस सार्वजनिक बांधकाम विभागाकडून काढण्यात आली आहे.

या संदर्भात ठाण्याचे माजी महापौर नरेश म्हस्के, स्थानिक माजी नगरसेवक सुधीर कोकाटे आणि पोलीस लाईनमधील रहिवासी महिला वर्गाने आज पोलीस आयुक्त जगजितसिंह आणि अपर पोलीस आयुक्त(प्रशासन विभाग)  प्रवीण पवार यांची भेट घेतली. या संदर्भात ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशीही यावेळी फोनवर चर्चा करण्यात आली. चर्चेअंती इथल्या रहिवाश्यांना काही पर्यायी मार्ग सुचवण्यात आले आहेत.

पोलीस लाईनमध्ये जवळपास ६५०-७०० कुटुंब गेली अनेक वर्षे राहत आहेत. अचानक आलेल्या या पत्रामुळे पोलीस कुटुंब भयभीत झाले आहेत. रहिवाशांनी थेट ठाण्याचे माजी महापौर नरेश म्हस्के आणि स्थानिक माजी नगरसेवक सुधीर कोकाटे यांची भेट घेऊन या प्रकरणात मदतीची मागणी केली असता माजी महापौर नरेश म्हस्के यांनी तत्काळ पालकमंत्री एकनाथ शिंदे, पोलीस आयुक्त जगजितसिंह, अपर पोलीस आयुक्त (प्रशासन विभाग) प्रवीण पवार यांच्याशी चर्चा करून यावर काही दिलासादायक पर्यायी मार्ग इथल्या नागरिकांसाठी उपलब्ध केले आहेत.

या चर्चेत या इमारती ताबडतोब रिकाम्या करण्याची आवश्यकता नसून या इमारतींचे आधी स्ट्रक्चरल ऑडिट करण्यात येणार आहे, असे नरेश म्हस्के यांनी सांगितले. ज्या लोकांना ताबडतोब स्थलांतरित व्हायचं असेल त्यांना पोलीस खात्याकडून ताबडतोब एचआरए देण्याची परवानगी देण्यात आली आहे. सोबतच एमएमआरडीए, म्हाडा यांच्या माध्यमातून काही घरं उपलब्ध होतील का या दृष्टीने प्रयत्न चालू आहेत. या संदर्भात आठवड्याभरात पुन्हा एकदा चर्चा करण्यात येणार आहे, ज्यात या पोलीस वसाहतीतील रहिवाशांना न्याय मिळवून देऊन त्यांची कुठल्याही प्रकारची गैरसोय होणार नाही या दृष्टीने प्रयत्न केले जातील, असे आश्वासन म्हस्के यांनी यावेळी दिले.