ठाणे : शहरात मध्यवर्ती असलेल्या जवाहरबाग स्मशानभूमीची पाहणी आज महापालिका आयुक्त डॉ. विपीन शर्मा यांनी केली. यावेळी संपूर्ण स्मशानभूमीची अधिकाऱ्यांसमवेत पाहणी करुन या ठिकाणी आवश्यक असलेली सर्व कामे तातडीने करण्याचे आदेश संबंधित अधिकाऱ्यांना दिले. शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या स्मशानभूमीमध्ये पाईप गॅस शवदाहिनी बसविण्याबाबत प्रयत्न करणार असल्याचेही आयुक्तांनी यावेळी नमूद केले.
ठाणे शहरातील स्मशानभूमींचा पाहणी दौरा महापालिका आयुक्त करीत असून मंगळवारी माजिवडा, मानपाडा, लोकमान्यनगर रायलादेवी, वर्तकनगर या ठिकाणच्या स्मशानभूमीची पाहणी केली. आज शहरातील मुख्य असलेल्या जवाहरबाग स्मशानभूमीची पाहणी केली.
जवाहरबाग स्मशानभूमी खूप जुनी स्मशानभूमी आहे, तसेच मध्यवर्ती ठिकाणी ही स्मशानभूमी असल्यामुळे येथे मोठ्याप्रमाणावर अत्यंविधी होत असतात. या ठिकाणी डिझेल शववाहिनी, एलपीजी व सीएनजी शववाहिनी असून याचाही वापर मोठ्याप्रमाणावर होत आहे. या ठिकाणी असलेल्या चुल्हयांची तपासणी करुन ते योग्य स्थितीत आहेत की नाही त्याची पडताळणी करावी, नसल्यास त्याची डागडुजी करण्याचे आदेश आयुक्त डॉ. विपीन शर्मा यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले. या ठिकाणी असलेली डिझेलची नादुरुस्त असलेली शवदाहिनी तातडीने काढण्यात यावी, तसेच चिमण्यांमधून व्हेंटीलेशन योग्यप्रकारे होत आहे का याचीही पाहणी करण्याच्या सूचना यावेळी दिल्या. अत्यंविधीसाठी येणारे नागरिक हे दु:खी असतात, त्यामुळे येथे आल्यानंतर त्यांना कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये यासाठी स्मशानभूमीमध्ये पाण्याची उपलब्धतता नियमित ठेवावी, तसेच आवश्यक त्या ठिकाणी रंगरंगोटी करणे, छत दुरूस्तीची कामे तसेच स्वच्छतागृहांची साफसफाई नियमित करण्याचे आदेश यावेळी आयुक्तांनी दिले.
गेले आठवडाभर ठाणे शहरातील रस्ते सफाई, स्वच्छता, शाळांची पाहणी महापालिका आयुक्त करीत आहेत. आज शहरातील मुख्य स्मशानभूमीची पाहणी देखील त्यांनी केली. या ठिकाणी आवश्यक असलेली कामे करण्याच्या सूचनाही त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या. ठाणेकरांना चांगल्या सुविधा देण्यासाठी आम्ही सर्वजण प्रयत्न करीत असल्याचे माजी महापौर नरेश म्हस्के यांनी यावेळी नमूद केले.