ठामपाच्या तिजोरीत फक्त ४४ कोटींची पाणीपट्टी
ठाणे : कोरोनामुळे भेडसावत असलेली आर्थिक चणचण, त्यात वादग्रस्त ठरलेल्या स्मार्ट मीटरच्या माध्यमातून देण्यात आलेली पाणीपट्टीची बिले यामुळे यावर्षी ठाणे महापालिकेला ४० कोटींचा फटका बसला आहे.
कोरोनाच्या साथीमुळे ठाणे पालिकेच्या उत्पन्नावर परिणाम झाला असतानाही कोरोना काळात चांगली वसुली करत पाणीपुरवठा विभागाने १५४ कोटी रुपये वसूल केले होते. मात्र त्याचवेळी गतवर्षीच्या तुलनेत यंदा म्हणजेच 2021-22 या आर्थिक वर्षात महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने 40 कोटी रुपयांची कमी पाणीपट्टी वसुली केल्याचे समोर आले आहे. यावर्षी एप्रिल आणि मे महिन्यात कोरोनाच्या संसर्गामुळे बिल भरण्यास होणारा विलंब आणि स्मार्ट मीटर पद्धतीने बिलाची वसुली झाल्याने पाणी वसुलीवर परिणाम झाल्याचे पालिका प्रशासनाचे म्हणणे आहे.
2020-21 हे आर्थिक वर्ष सुरू होताच, म्हणजे एप्रिल महिन्यातच, कोरोनाचा प्रादुर्भाव तसेच करण्यात आलेल्या लॉकडाऊनचा मोठा परिणाम ठाणे पालिकेच्या विविध उत्पन्नावर झाला होता. लॉकडाऊन लागू होऊन दोन महिने उलटल्यानंतर महापालिकेच्या मालमत्ता कर विभागाने करवसुली सुरू केली. मात्र पाणी वसुली सुरू होऊ शकली नाही.महापालिका आयुक्त डॉ.विपीन शर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली 2020 च्या जुलै महिन्याच्या शेवटच्या दिवसांपासून पाणीपट्टी वसुली मोहीमही सुरू करण्यात आली होती. कोरोना महामारी असतानाही 2020-21 या वर्षात महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने 1 एप्रिल ते 28 मार्च या कालावधीत 154 कोटी, 5 लाख 41 हजार 633 रुपयांची वसुली केली होती. मात्र गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा सुमारे 40 कोटी, 11 लाख 13 हजार 551 इतकी कमी वसुली झाली आहे.
यावर्षी ११३ कोटींची वसुली
यावर्षी महापालिका प्रशासनाने पाणीपट्टी पोटी ११३ कोटी ९३ लाख ९८ हजार ८२ रुपये वसूल केले आहेत. ज्यामध्ये शहरातील मीटर नसलेल्या ग्राहकांकडून 62 कोटी 29 लाख 49 हजार 819 रुपये तर स्मार्ट मीटरिंग प्रणाली असलेल्या ग्राहकांकडून 44 कोटी 20 लाख 69 हजार 838 रुपये असा एकूण 106 कोटी 50 लाख 19 हजार 657 रुपयांची वसुली केलीआहे. तर महापालिकेच्या सीएफसी व इतर वास्तूंमधून पाणीपट्टीच्या स्वरूपात सुमारे ७ कोटी ४३ लाख ७८ हजार ४२५ रुपये वसूल करण्यात आले असल्याचे प्रशासनाच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे.
वसुलीचा वेग वाढावा यासाठी पालिका आयुक्त डॉ. विपीन शर्मा यांनी सुट्टीच्या दिवशीही कार्यालये सुरु ठेवण्याचे आदेश दिले. त्यामुळे काही प्रमाणात का होईना याचा सकारात्मक परिणाम दिसून आला आहे. पाणीपुरवठा विभागाने २६ मार्च रोजी ८५ लाख ४९ हजार तर २७ मार्च रोजी ४९ लाख ५० हजार रुपयांची वसुली केली होती. अशाप्रकारे दोन्ही दिवशी सुट्टी असतानाही सुमारे एक कोटी 49 लाख 90 हजार रुपयांची वसुली करण्यात महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाला यश आले.