आमदार प्रताप सरनाईक यांच्या मागणीला सकारात्मक प्रतिसाद
ठाणे : ठाणे आणि मीरा-भाईंदर येथील सुविधा भुखंडावर ‘भारतरत्न स्व. लता दिनानाथ मंगेशकर संगीत विद्यालय’ म्हणजेच संगीत गुरुकुल एमएमआरडीएच्या माध्यमातून विकसित करण्यात यावे व त्यासाठी राज्य सरकारने निधी द्यावा अशी मागणी शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांनी केली आहे. यावर एमएमआरडीएच्या आयुक्तांनी प्रस्ताव सादर करावा , असे आदेश राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी एमएमआरडीएच्या महानगर आयुक्तांना दिले आहेत.
या मागणीबाबत नुकतीच आमदार प्रताप सरनाईक यांनी महाराष्ट्र राज्याचे नगरविकास मंत्री व ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. संगीत गुरुकुल उभारण्याच्या मागणीचे सविस्तर निवेदन आमदार सरनाईक यांनी मंत्र्यांना दिले आहे.
भारतरत्न लता मंगेशकर यांच्या निधनानंतर त्यांच्या स्मृती जपल्या जाव्यात अशी मागणी नागरिकांमधून होत आहे. त्यामुळे मीरा-भाईंदर महानगरपालिका क्षेत्रातील आरक्षण क्र. २४६ खेळाचे मैदान आरक्षित भूखंडावर १५ टक्के बांधकाम अनुज्ञेय असल्यामुळे या भुखंडावर तसेच ठाणे महानगरपालिका क्षेत्रातील वर्तकनगर येथील रेप्टाकोस कंपनीच्या सुविधा भुखंडावर भारतरत्न स्व. लता दिनानाथ मंगेशकर संगीत विद्यालय (गुरूकुल) एमएमआरडीएच्या माध्यमातून निर्माण केल्यास खऱ्या अर्थाने त्यांना ठाणे व मीरा-भाईंदर शहराच्या वतीने श्रध्दांजली मिळेल आणि लता दिंदीचे कायम स्मरण होत राहील, असे आमदार सरनाईक यांनी म्हटले आहे.
या संगीत विद्यालयाचे काम तत्काळ सुरु करण्यासाठी महापालिकेकडे पुरेसा निधी नाही. संगीत विद्यालयाच्या उभारणीसाठी मोठ्या प्रमाणात निधीची आवश्यकता लागणार आहे. पालिकेकडे निधीची अडचण असल्याने व संगीत विद्यालय हा मोठा प्रकल्प असल्याने एमएमआरडीएने त्यासाठी निधी द्यावा, अशी मागणी आमदार सरनाईक यांनी केली आहे.
राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली ९ फेब्रुवारी २०२२ रोजी झालेल्या मंत्रीमंडळाच्या बैठकीमध्ये राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी सादर केलेल्या ‘लता मंगेशकर विद्यापीठाला’ सुध्दा मंत्रीमंडळाने मान्यता दिली आहे. ठाणे व मीरा-भाईंदर शहरामध्ये जर लता मंगेशकर संगीत अकॅडमी निर्माण करून ती राज्य शासनाच्या संगीत विद्यापीठाशी संलग्न केल्यास त्याचा फायदा ठाणे व मीरा भाईंदर शहरातील उदयोन्मुख गायकांना होईल तसेच दोन्ही शहरातून अनेक संगीतरत्न या संगीत अकॅडमीच्या माध्यमातून भविष्यात निर्माण होतील असा विश्वास आमदार सरनाईक यांनी व्यक्त केला आहे.
मीरा-भाईंदर महानगरपालिका क्षेत्रातील आरक्षण क्र. २४६ व ठाणे महानगरपालिका क्षेत्रातील वर्तकनगर येथील रेप्टाकोस कंपनीच्या सुविधा भुखंडावर ‘भारतरत्न स्व. लता दिनानाथ मंगेशकर संगीत विद्यालय (गुरुकुल)’ एमएमआरडीएच्या माध्यमातून निर्माण करण्याची मागणी आमदार प्रताप सरनाईक यांनी केली असता, नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी त्याला सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. एकनाथ शिंदे यांनीही अशा प्रकारे संगीत विद्यालयाचा प्रकल्प शहरात व्हायला हवा असे सांगत एमएमआरडीएचे आयुक्त श्रीनिवासन यांना या कामाचा प्रस्ताव सादर करण्याचे आदेश दिले आहेत. आता हे संगीत विद्यालय उभे करायचे झाल्यास त्याबाबतचा प्राथमिक प्रस्ताव एमएमआरडीएकडून लवकरच तयार केला जाणार आहे.