विठुराया आणि भक्तांमधलं अंतर संपणार, गुढीपाडव्यापासून पायावरील दर्शन सुरु होणार!

विठ्ठल भक्तांसाठी खुशखबर आहे. आता विठुराया आणि भक्तांचे अंतर संपणार आहे. मुख्यमंत्र्यांच्या घोषणेनंतर गुढीपाडव्यापासून देवाच्या पायावरील दर्शन सुरु होणार आहे. अनेक लहानमोठ्या व्यापाऱ्यांची उपासमार थांबणार आहे.

पंढरपूर : गेल्या दोन वर्षांपासून कोरोनाच्या संकटामुळे विठुरायाची बंद असलेली पायावरील दर्शन व्यवस्था गुढीपाडव्यापासून सुरु होणार आहे. यामुळे गेल्या दोन वर्षांपासून उपासमार होत असणाऱ्या लहान व्यापाऱ्यांची उपासमार थांबणार आहे. कोरोनाचे संकट सुरु झाले आणि 17 मार्च 2020 पासून विठ्ठल मंदिर बंद झाले होते. यानंतर नंतर मंदिर खुले झाले तरी निर्बंधामुळे विठुरायाचे दूरुन दर्शन घ्यावे लागत होते.

आता कोरोनाचे संकट संपत असताना मंदिर समिती आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यात झालेल्या चर्चेनुसार सरकार पदस्पर्श दर्शनाबाबत सकारात्मक असून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे याबाबत घोषणा करतील असे संकेत मिळाले होते. यानंतर मंदिर समिती सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी आज (30 मार्च) होणाऱ्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णयानंतर 1 एप्रिलपासून देवाच्या पायावरील दर्शन सुरु होणार असल्याचं सांगितलं आहे.

दरम्यान या निर्णयामुळे विठ्ठल भक्तात आनंदाचे वातावरण असून आता देव आणि भक्तातील विरह संपेल अशा भावना विठ्ठल भक्त व्यक्त करत आहेत .

मंदिर बंद झाल्यापासून कोरोनाच्या नियमानुसार मंदिरात तुळशीहार, फुले, प्रसाद नेता येत नव्हता. यामुळे गेल्या दोन वर्षांपासून मंदिर परिसरात हातावर पोट असणाऱ्या शेकडो लहान व्यापाऱ्यांना उपासमार सहन करावी लागत होती. आता पुन्हा पायावर दर्शन सुरु झाल्यावर भाविकांना देवाला अर्पण करण्यासाठी हार, फुले, प्रसाद आत घेऊन जात येणार आहे. यामुळे या शेकडो लहान व्यापाऱ्यांची उपासमार बंद होणार असल्याने या व्यापाऱ्यांमध्येही उत्साहाचं वातावरण आहे.