डोंबिवलीत एमआयडीसी परिसरात नाला झाला निळा

डोंबिवली : डोंबिवलीत हिरवा पाऊस, गुलाबी रस्त्याची शहरात जोरदार चर्चा झाली होती. आता तर नाल्यातून निळ्या रंगाचे पाणी वाहत असल्याचा व्हिडिओ सामाजिक माध्यमात व्हायरल होत आहे.

सोमवारी डोंबिवली एमआयडीसी फेज प्रोबेस कंपनी परिसरात हा प्रकार घडला आहे. आजूबाजूच्या कंपन्यामध्ये प्रक्रिया केलेले सांडपाणी थेट नाल्यात सोडण्यात आल्याने हा त्रास झाल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्ते शशिकांत कोकाटे यांनी केला आहे. याबाबत स्थानिक नागरिकांनी प्रदूषण नियत्रण मंडळाकडे तक्रार केल्याचे शशिकांत कोकाटे यांनी सांगितले. दरम्यान याबाबत कल्याण प्रदूषण नियत्रण मंडळाचे अधिक्षक अभियंता बाबासाहेब कुकडे यांना विचारले असता त्यांनी याबाबतच्या तक्रारी प्राप्त झाल्या असून प्रदूषण मंडळाचे पथक तातडीने घटनास्थळी धाडण्यात आले आहे. पाहणी करून संबधितावर तातडीने कारवाई केली जाईल असे त्यांनी सांगितले.

डोंबिवली औद्योगिक विभागात वायू प्रदूषण, जल प्रदूषण सारख्या तक्रारी सर्रास येत असून डोंबिवलीचं भोपाळ करायचं आहे का अशी विचारणा डोंबिवलीकर करीत असल्याची चर्चा आहे. सुमारे 150 रासायनिक कंपन्यांमुळे प्रदूषण होत आहे. त्यामुळे त्या हद्दपार कराव्यात, अशी मागणीही होत असून याबाबत उद्योगमंत्री सुभाष देसाई यांची भूमिका अद्याप गुलदस्त्यात असून याकडे वेळोवेळी येणाऱ्या प्रदूषणाच्या तक्रारीमुळे लक्ष वेधले जाईल का ? अशी विचारणा होत आहे.

याबाबत कामा संघटनेचे अध्यक्ष देवेन सोनी यांनी सांगितले की, चेंबर तुंबल्याने हा प्रकार दिसून आला परंतु चेंबर मधील सफसफाई केल्यानंतर हा प्रश्न निकालात निघाला आहे. प्रत्यक्षात नाल्यावर कचऱ्याच्या गाड्या रिकाम्या करून नाल्यात कचरा जात असल्याने नाला तुंबून चेंबरमध्ये समस्या निर्माण होत आहेत असेही सोनी यांनी सांगितले.