ठाणे : महापालिका आयुक्तांच्या संकल्पनेनुसार कल्याण डोंबिवली नगरी स्वच्छ व सुंदर रहावी , यासाठी घनकचरा विभागातील अधिकारी/कर्मचारी, उपआयुक्त रामदास कोकरे यांच्या मार्गदर्शनाखाली कचरा संकलन करणे ओला-सुका कचरा वर्गीकरण करणे यासाठी अविरत प्रयत्न करीत आहेत. या प्रयत्नांमुळे महापालिका क्षेत्रात आता सुमारे 90 -95 टक्के कच-याचे वर्गीकरण होऊ लागले आहे.
महापालिकेने कच-यापासून बनविलेल्या सेंद्रीय खताला मोठया प्रमाणावर मागणी असून महापालिकेच्या उंबर्डे आणि बारावे येथील प्रकल्पांवर गत वर्षभरात सुमारे 10 हजार मेट्रीक टन खताची निर्मिती करण्यात आली आहे, तथापि महापालिकेच्या काही भागात अरुंद रस्ते, गल्ली बोळ असल्यामुळे सदर ठिकाणी कचरा संकलनासाठी महापालिकेची मोठी वाहने पोहचू शकत नाही. त्यामुळे सदर ठिकाणी कचरा संकलन होत नसल्याच्या तक्रारी महापालिकेकडे तेथील नागरिकांकडून तक्रारी प्राप्त होत होत्या. या तक्रारींचे निवारण करण्याकरीता महापालिकेच्या घनकचरा विभागामार्फत आता 25 सायकल रिक्क्षांची खरेदी करण्यात येणार असून या सायकल रिक्क्षा अरुंद रस्त्यांवर, गल्ली बोळात फिरुन कचरा गोळा करणार असल्यामुळे अशा ठिकाणी राहणा-या नागरिकांचे कच-याबाबतच्या समस्येचे निवारण होवून त्यांना दिलासा मिळणार आहे.