गतिमंद अल्पवयीन मुलीवर अत्याचार; नराधमास अटक

ठाणे : गतिमंद अल्पवयीन मुलीला चॉकलेटचे आमिष दाखवून तिच्यावर अत्याचार करणाऱ्या नराधमाला कोणत्याही प्रकारचे धागेदोरे नसताना कळवा पोलिसांनी बेड्या ठोकल्या ठोकल्या आहेत.

श्रीकांत गायके (३६) असे नराधमाचे नाव असून तो कळवा पूर्व भागातील शांतीनगर झोपडपट्टी येथे राहतो. त्याच परिसरात राहणाऱ्या एका १६ वर्षीय अल्पवयीन गतिमंद मुलीला चॉकलेटचे आमिष दाखवून ६ मार्च रोजी त्याने मफतलाल कंपनीच्या पडीक बिल्डिंगच्या भागात झाडाझुडुपांमध्ये त्याने तिच्यावर अत्याचार केला होता. मुलीला त्रास होत असल्याचे तिच्या आईच्या ध्यानात आले. तिने तिला विश्वासात घेऊन माहिती जाणून घेतली असता मुलीवर अत्याचार झाल्याचे पालकांना समजले. त्यांनी शासनाच्या बाल संरक्षण विभागाच्या हेल्पलाईनवर तक्रार केली. त्याची दखल घेऊन कळवा पोलीस ठाण्यात २६ मार्च रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्या मुलीला विश्वासात घेऊन पोलिसांनी तिने दिलेल्या माहितीच्या आधारे पूर्व भागातील झोपडपट्टी भागात शोध घेतला.

सहाय्यक निरीक्षक मंगेश महाजन यांना बातमीदाराने दिलेल्या माहितीनुसार शांतीनगर झोपडपट्टीमधील श्रीकांत गायके याला पोलिसांनी ताब्यात घेऊन त्याची चौकशी केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली. या नराधमाला पत्नी आणि तीन मुले आहेत. तो मजुरीचे काम करतो. ती मुलगी गतिमंद असल्याने अत्याचाराच्या बाबत कोणाला काही सांगणार नाही असा आरोपीचा समज झाला होता, परंतु पोलिसांनी त्याच्या मुसक्या अखेर आवळल्या, असे आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत पोलीस उपायुक्त अविनाश अंबुरे यांनी सांगितले.