ठाण्यातील बहुचर्चित आर्ट गॅलरीला उतरती कळा

* आर्ट गॅलरी बंद होण्याच्या मार्गावर
* चार वर्षांपूर्वी झाला एक कोटींचा खर्च

ठाणे : ठाणे शहरात कलेला वाव देत चार वर्षांपूर्वी ठाणे महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांच्या पुढाकाराने काळा घोडा येथे असलेल्या आर्ट प्लाझाच्या धर्तीवर आर्ट गॅलरी बनविण्यात आली. एक कोटी खर्च करून चार वर्षही लोटले नाहीत तोवर या आर्ट गॅलरीची नासधूस महापालिकेच्या बांधकाम विभागाच्या माध्यमातून सुरू झाली आहे.

या गॅलरीच्या मधोमध मोठे खड्डे केले असून याच परिसरात फुट ओव्हर ब्रीजच्या पिलरचे कामही करण्यात येत आहे. त्यामुळे ही आर्ट गॅलरी नामशेष होण्याची शक्यता आहे. ही आर्ट गॅलरी वाचविण्यासाठी सोमवारी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे स्वप्नील महिंद्रकर यांच्या वतीने आर्ट गॅलरीच्या बचावासाठी ठिय्या आंदोलन करण्यात आले.

चार वर्षांपूर्वी बांधण्यात आलेल्या या गॅलरीच्या निर्मितीमुळे ठाण्यातील कला रसिकांच्या कलेला प्राधान्य देत त्यांच्या कलेचे प्रदर्शन भरविण्यासाठी एक चांगली संधी उपलब्ध झाली होती. या आर्ट गॅलरीमध्ये सुमारे ४० आर्टिस्टिक पेंटींग प्रदर्शित करू शकतील इतकी व्यवस्था करण्यात आली होती. पण या सर्व व्यवस्थेचा पालिकेच्या भूमिकेमुळे बट्ट्याबोळ झालेला दिसून येत आहे. महापालिकेच्या बांधकाम विभागाच्या माध्यमातून गॅलरीमध्ये मोठे खड्डे केले असून फुट ओव्हर ब्रीजच्या पिलरचे कामही सुरू केले आहे.

सिंघानिया शाळेच्या परिसरात असलेल्या फूटपाथवर ही आर्ट गॅलरी उभारण्यात आली होती. मात्र याचा फुटपाथवरील नागरिकांना कोणताच त्रास होत नव्हता. ठाणे शहरातील पडलेल्या खड्ड्यांचे प्रदर्शनही मनसेच्या वतीने याच आर्ट गॅलरीमध्ये भरविण्यात आले होते. सर्वसामान्यांच्या कलेला वाव देणाऱ्या या आर्ट गॅलरीच्या बचावासाठी मनसेच्या वतीने आंदोलन करत तीव्र संताप व्यक्त केला. घोषणाबाजीमुळे आंदोलकांनी परिसर दणाणून सोडला. आर्ट गॅलरी वाचविण्यासाठी पालिकेने सकारात्मक भूमिका न घेतल्यास मनसेच्या वतीने तीव्र आंदोलनाचा इशारा यावेळी मनसेच्या स्वप्नील महिंद्रकर यांनी प्रशासनाला दिला आहे.